डेक्कन येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बारा हजार रुपयांची आरक्षित तिकिटे आणि रोख चार हजार रुपये जप्त करण्यात आली आहेत.
नवनाथ भाऊ दहिभाते (वय २२, रा. शिवशक्तीनगर, कोथरुड) आणि प्रवीण विठ्ठलराव नाईक (वय ४३, रा. गोसावी वस्ती, कोथरूड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी रेल्वेचे सतर्कता निरीक्षक टी. एम. रामचंद्रन यांनी फिर्याद दिली आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसांना डेक्कन येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर आरक्षित तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, शुक्रवारी सकाळी लोहमार्ग पोलिसांनी डेक्कन रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर लक्ष ठेवून दहिभाते यांना पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे रेल्वेचे तिकीट आरक्षण करण्याचा परवाना व अधिकार पत्र नसल्याचे आढळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत नाईक याच्या सांगवण्यावरून तिकिटे आरक्षित केल्याचे दहिभाते याने सांगितले. त्यानुसार गांधी भवन येथील नाईक याच्या घरी जाऊन छापा टाकला. त्याच्या घरातून सात हजार रुपयांची आरक्षित तिकिटे जप्त करण्यात आली
आहेत.
दुसऱ्या घटनेत आरक्षित तिकिटे घेणाऱ्या राजेश विजयकृष्ण नायर (वय ३९, रा. कर्वेनगर)याला लोहमार्ग पोलिसांनी डेक्कन येथील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर अटक केली. त्याच्याकडून साडेचार हजार रुपयांची आरक्षित तिकिटे आणि रोख तीन हजार दोनशे रुपये जप्त करण्यात आले आहेत.