मढ, मार्वे आणि आक्सा समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या लॉजमधल्या जोडप्यांवर मालवणी पोलिसांनी केलेली कारवाई वादात सापडली असून या प्रकरणाच्या पोलिसांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे, परंतु हा भाग अनैतिक व्यवसायाचे केंद्र बनला असून तेथे बलात्काराच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत येथे १४ बलात्कार झाले असून समुद्रात बुडून ९३ जणांचे जीव गेलेले आहेत. येथील अनैतिक व्यवसायांवर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरत आहेत.६ ऑगस्ट रोजी मालवणी पोलिसांनी मढ आणि मार्वे समुद्रकिनाऱ्यांवरील चार लॉजवर कारवाई केली. या कारवाईत तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळल्या. मात्र पोलिसांनी लॉजमध्ये आलेल्या १३ जोडप्यांवर मुंबई पोलीस अॅक्ट ११० प्रमाणे (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे) दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पोलिसांवर टीकेची झोड उठली. जोडप्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असली तरी या भागातील दिवस-रात्र सुरू असलेल्या लॉजमुळे येथील स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील डोंगरपाडा, आक्सा गाव, धारवली गाव परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी करून येथील लॉजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या भागात एकूण ६० ते ७० लॉज आहेत. दर तासाला पाचशे ते हजार रुपये आकारून येथील खोल्या दिल्या जातात. दिवस-रात्र येथील लॉज सुरू असतात. त्यामुळे जोडप्यांकडून लाखो रुपयांचा व्यवहार होत असतो. स्थानिक पोलिसांना या लॉजमधून दर महिन्याला मोठा मलिदा मिळत असतो. रिक्षाचालक जोडप्यांना ठरलेल्या लॉजमध्ये घेऊन जातात. त्यात त्यांना कमिनश मिळत असते, असे कणसरी मात आदिवासी समाजसेवा संस्थेने पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. येथे रस्त्यात बसून मद्यपान केले जाते. स्थानिक महिला आणि मुलींना येथे येणाऱ्या लोकांच्या कामुक नजरांना तोंड द्यावे लागते. छेडछाडीचे प्रकार तर दररोजचे झाले आहेत.
२००९ पासून लॉजमध्ये बलात्काराचे १४ गुन्हे दाखल आहेत. तर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे २२ गुन्हे दाखल आहेत. येथील समुद्रात बुडून ९३ जणांचा मृत्यू झालेला आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले. येथील समुद्रकिनारे सुरक्षित नसल्याचेही ते म्हणाले.
दर तासाचे भाडे आकारून जोडप्यांना खोल्या भाडय़ाने दिल्या जातात. अनेक जण स्वेच्छेने इथे येत असतात. पण अनेकदा मुलींना त्यांचे प्रियकर फसवून आणत असतात, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुली वयाने सज्ञान असल्या तरी विशीच्या घरातील मुलींना तेवढी समज नसते आणि त्या मग बळी पडतात, परंतु त्यांच्या तक्रारी नोंदविल्या जात नाहीत. काही वर्षांपूर्वी एक तरुण अल्पवयीन शाळकरी मुलींना फसवून येथील लॉजमध्ये आणून त्यांच्यावर बलात्कार करायचा. एका अभिनेत्याची मुलगी त्याला बळी पडल्याने हे प्रकरण समोर आले, परंतु त्याने अत्याचार केलेल्या मुलींच्या तक्रारी नोंदच झाल्या नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.