बीड जिल्ह्य़ातील आंबेजोगाई तालुक्यातून उरणमध्ये आलेले विकास पवार हे लोहार काम करत आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र कोळशाच्या वाढत्या दरामुळे सध्या आर्थिक गणिताची जुळवाजुळव करणे जिकिरीचे होऊ लागले आहे. पवार यांच्यासारखी लोहारकाम करणाऱ्या कुटुंबीयांची व्यथा एकसारखीच. कारण लागणाऱ्या भात्यासाठीच्या कोळशाचे भाव दरवर्षी वाढू लागल्याने ऐरणीच्या देवाला ठिंगणी वाहनेही कठीण झाले आहे.त्यामुळे लोहार कामासाठीच्या दरातही वाढ झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला असून जगण्यासाठी घर-गाव सोडून आलेल्या अनेक लोहार कुटुंबांची परवड होऊ लागली आहे.त्यामुळे परंपरागत लोहारकीच्या व्यवसायावर संकट आले आहे.
पावसाळा संपला की राज्यातील विविध जिल्ह्य़ांतून शेतकरी, कामगारांना लागणाऱ्या विविध वस्तू हत्यारे बनविण्याचा व्यवसाय करणारे लोहार गावोगावी आपली पाले टाकतात. अख्या कुटुंबीयासह आलेल्या या व्यावसायिकांना थंडी, ऊन यांची तमा न बाळगता अनेक संकटांवर मात करीत केवळ जगण्यासाठी हा व्यवसाय करावा लागतो. ओबडधोबड लोखंडाला भात्याच्या साहाय्याने कोळशातील ज्वालांवर तापवून लालबुंद करून त्यावर घणाचे घाव टाकून आकार दिला जातो. घणाचे घाव घालण्यासाठी घरातून गृहलक्ष्मीही मदत करते हे पाहून महिलांना कमी लेखणाऱ्यांची किव करावीशी वाटते. कोपरखैरणे येथून भात्यासाठी कोळसा आणावा लागतो. मागील वर्षी १० रुपये किलो असलेला कोळसा आता २० रुपये किलोवर गेला आहे.तसेच हत्यारांकरिता लागणाऱ्या मुठीचे लाकूडही महाग झाले आहे.त्याचप्रमाणे उरणसारख्या शहर परिसरात राहून जीवन जगणे म्हणजे रोजचे कमवायचे, रोजचे खर्च करायचे आणि शिलकी शून्य असा संसाराचा गाडा चालवावा लागत असल्याचे विकास पवार सांगतो. पवार यांची दोन मुले आहेत. नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत ही मुले शिक्षण घेत आहेत. पवार स्वत: १२ वीपर्यंत शिक्षण घेऊनही त्याला लोहार काम करावे लागत आहे. गावी शेती आहे, परंतु जगण्यासाठी उरणमध्येच राहावे लागते. त्याच्यासारख्या अनेकांची कहाणी अशीच. व्यवसायवाढीसाठी आणि टिकवण्यासाठी शासकीय पातळीवर कर्ज उपलब्ध व्हावे असे मत तो व्यक्त करतो .त्यातूनच हा पारंपरिक व्यवसाय टिकू शकेल असे त्याला वाटते.