सांगली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात झालेल्या 55 लाखांच्या अपहारप्रकरणावरून सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होऊन समाजकल्याण विभागालाच आरोपीच्या पिंज-यात सदस्यांनी उभे केले. या अपहारप्रकरणी कोणालाही पाठिशी न घालता कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे अध्यक्ष देवराज पाटील होते. सभेपुढे असणा-या विषयपत्रिकेवरील ९ आणि आयत्या वेळच्या ९  अशा १८ विषयांवर विविधांगी चर्चा झाली. समिती सभापतींच्या निवडीसाठी पडद्याआड राजकीय घडामोडींनंतर उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी हक्क सांगितलेल्या बांधकाम समितीचे सभापतिपद गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे समर्थक दत्ताजीराव पाटील यांना देण्यात आले, तर कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती राजेंद्र माळी यांची निवड करण्यात आली. तर पंचायत समिती सभापती प्रतिनिधी म्हणून भारती पाटील या खानापूरच्या सभापतींच्या कृषी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.  उपाध्यक्ष बसवराज पाटील यांच्याकडे शिक्षण व अर्थ या दोन समित्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
सदस्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याबद्दल अनेक सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. मीनाक्षी महाडिक यांनी प्राथमिक शिक्षणामध्ये परीक्षा बंद केल्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मर्यादा आल्याचा विषय सभागृहापुढे मांडला, तर संजीव सावंत यांनी पाणलोट क्षेत्राचा निधी जिल्हा परिषदेकडे देण्यात यावा अशी मागणी केली.
सुरेश मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत आग्रही भूमिका मांडत फौजदार कारवाईची मागणी केली. तर श्री. महाडिक यांनी पाणी पुरवठा विभागातील देखभाल दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्ग ठेकेदारांचे दलाल असल्याचा गंभीर आरोप केला. कृषी विभाग कर्नाटकला जाणारे रासायनिक खत पकडूनही गोलमाल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. याची फेरचौकशी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
समाजकल्याण विभागात झालेल्या गरव्यवहारप्रकरणी अधिकाऱ्र्याचा खुलासा समाधानकारक नसल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नारनवरे यांनी फेरखुलासा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. हा खुलासा प्राप्त होताच कारवाईच्या शिफारशीसह समाजकल्याण आयुक्तांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. ५५ लाखांच्या अपहारप्रकरणी लेखाअधीक्षक प्रशांत हर्षद व श्री. गोसावी यांना निलंबित करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्या विरुद्ध फौजदारी दाखल करण्याचे आदेश चौकशी समितीला देण्यात आले आहेत.