दीपावली म्हणजे आनंदाचा आणि प्रकाशाचा सण. या पर्वावर रविवारी अंध असलेल्या चेतन उचितकर याने तालुक्यातील सुरकंडी या गावातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना सौर कंदिलांचे वाटप करून आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.
घराघरात शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी शासन सर्वतोपरी पुढाकार घेत आहे. झोपडीत, पालात राहणाऱ्या व भटकंती करणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्या कु टुंबातील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न शासन करत आहे. अद्यापही अनेक कुटुंबापर्यंत पोहोचण्यात शासनाला अपयश येत आहे. मूलभूत गरजाही काही मुलांपर्यंत पोहोचत नसल्याने अनेक मुले शिक्षण घेत असूनही त्यांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मुले शिक्षणात मागे पडत आहेत. ग्रामीण भागातील अनेक घरांपर्यंत वीज पोहोचलेली नसल्याने त्या गोरगरिबांच्या मुलांना अभ्यासासाठी होणारी अडचण दूर करण्याचा संकल्प स्वत: काळोखात जीवन जगणाऱ्या चेतन उचितकर याने घेतला आहे.
निसर्गाची देणे असलेल्या सौर ऊर्जेवर चालणारे सौरकंदील गोरगरिबांच्या मुलांना मोफत देऊन त्यांची अभ्यासाची अडचण दूर करण्यासाठी रविवारी चेतनने दीपावलीचे औचित्य साधून सौर कं दील वाटपाचा प्रारंभ केला. सुरकंडी येथील पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या गणेश कदम, कोमल कलापाड, अब्बास बेनिवाले, निकिता गायकवाड, मुस्कान चौधरी, शाहीन नौरंगाबादी, पल्लवी धामणे, विनायक भालेराव यांच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन चेतनने सौर कंदील वाटप केले. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा सचिव गजानन धामणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर ताकवाले, पांडुरंग उचितकर, गंगासागर उचितकर, भागवत साळसुंदर, युसूफ बेनिवाले, सुरेश भालेराव आदी उपस्थित होते.
तालुक्यातील केकतउमरा येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग उचितकर यांनी आपल्या एकुलत्या एक असलेल्या अंध चेतनला निराश न होता संस्कारित केले. आज हा छोटा चेतन राज्यभर प्रसिद्ध झाला आहे. उत्कृष्ट वाद्यवादनाबरोरच चेतन नेत्रदान, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, स्त्रीभ्रूणहत्या अशा विविध विषयांवर भाषणे करतो. चेतन नेत्रदान चळवळीचा वाशीम जिल्ह्य़ाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही झाला आहे. आपल्या प्रभावी भाषणांमुळे चेतन राज्यभर प्रबोधनासाठी जातो. चेतनला वडिलांप्रमाणेच समाजसेवेची आवड असल्याने त्याने त्याच्या खाऊच्या पैशातून सौरकंदील विकत घेऊन गोरगरिबांच्या पाल्यांना वाटपाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
एकीकडे इतर मुले फटाके फोडून आणि महागडय़ा वस्तू खरेदी करून दिवाळी साजरी करत असताना चेतनने आपल्याच वयाच्या मुलांना सौर कंदिलाचे वाटप करून समाजसेवेच्या गप्पा मारणाऱ्या समाजसेवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.