पोलीस स्थापना दिन व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त येथील नॅब संचलित अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांबाबत जागृतीसाठी शहरातून रॅली काढून वाहतुकीचे नियम पाळा असा संदेश दिला.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, नॅब संस्था, शहर पोलीस ठाणे आणि उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अंध शाळेपासून सुरू झालेली रॅली बेलापूर रस्ता, शिवाजी रस्ता, गांधी चौकमार्गे मुख्य रस्त्याने आझाद मैदानावर आली. रस्त्याने डाव्या बाजूने चला, सिग्नलचे नियम पाळा, वाहतुकीला अडथळा करू नका, असे संदेश अंध विद्यार्थ्यांनी श्रीरामपूरकरांना दिले. आझाद मैदानावर रॅलीचा समारोप झाला.
या प्रसंगी नॅबचे अध्यक्ष अ‍ॅड. भागचंद चुडीवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीवन अल्वारिस, पोलीस उपाधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक प्रकाश सपकाळे, अ‍ॅड. प्रसन्न िबगी, प्रदीप आहेर उपस्थित होते. अ‍ॅड. चुडीवाल यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस म्हणाले, जीवनात शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. अंध मुलांनी काढलेली रॅली सर्वसामान्यांसाठी दिशादर्शक ठरेल. त्यांनी दिलेला शिस्तीचा संदेश शहरवासीयांनी अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. िबगी यांनी आभार मानले.