टँकर अधिग्रहणाच्या प्रस्तावावर कारवाईस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी करताच पालकमंत्री सतेज पाटील यांनी गटविकास अधिकारी एम. एल. सावळसूरकर यांना धारेवर धरले. या दरम्यान विषयांतराची संधी मिळताच आढावा बैठक सोडून गटविकास अधिकाऱ्यांनी पळ काढला व ते गायब झाले. शोधाशोध करूनही ते सापडले नाहीत, ही बाब पुन्हा पाणीटंचाईचा विषय उपस्थित झाल्याने उघडकीस आली.
औसा तहसील कार्यालयात महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली आढावा बैठक झाली. आमदार बसवराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, तहसीलदार एल. टी चव्हाण यांची उपस्थिती होती. तालुक्यात सर्वत्र दुष्काळाच्या झळा पोहोचल्याने सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी सभागृह भरून गेले होते. लोकप्रतिनिधींनी अडचणी मांडण्याची संधी देताच गावकऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. टँकर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीत दाखल आहेत. गावात गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. सरपंच-उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक पंचायत समितीत चकरा मारत आहेत. परंतु गटविकास अधिकारी या मूलभूत प्रश्नावर तातडीने कारवाई करीत नाहीत. कारवाईअभावी दाखल प्रस्ताव धूळखात पडून आहेत, असा पाढा गावकऱ्यांनी वाचला. गावकऱ्यांच्या रेटय़ाची लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. मंत्री पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणी जाब विचारला. गटविकास अधिकाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर या वेळी देता आले नाही. यापुढे दिरंगाई केली तर आपले हात डोक्यावर ठेवून बसण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्या, असा दम मंत्र्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना भरला.
 पाटील यांनी तालुका प्रशासनाला पाणीपुरवठय़ाबाबत दक्ष राहण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष बनसोडे यांनी पाणीपुरठय़ाबाबत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. गावकऱ्यांच्या मागणीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतील दहा खेडी, तीस खेडी योजना कायमस्वरूपी प्रभावीपणे सुरू करण्याचे आश्वासन पाटील यांनी देताच टाळय़ांच्या गजरात उपस्थितांनी त्याचे स्वागत केले. यानंतर गावकऱ्यांनी अधिग्रहण प्रस्तावावर कार्यवाही होत नसल्याबाबत लक्ष वेधले. त्यावर पालकमंत्र्यांनी गटविकास अधिकारी कुठे आहेत? असा प्रश्न केला. त्या वेळी गटविकास अधिकाऱ्यांची शोधाशोध सुरू झाली. परंतु ते कुठेच सापडले नाहीत. शोध घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी आढावा बैठकीतून गायब झाल्याची कुजबुज सुरू केली. मात्र, आढावा बैठकीतून ते कधी गायब झाले? हे कोणालाही समजू शकले नाही.