परवाना रद्दचा झटका खाल्ल्यावर जागे होऊन सुरू केलेल्या महापालिकेच्या रक्तपेढीच्या कामकाजाची संयुक्त पाहणी महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी केली.शहरातील गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनीच असलेल्या या रक्तपेढीच्या व्यवस्थापकनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तिची शब्दश: वासलात लागली. रक्तपेढीप्रमुख म्हणून नियुक्ती असलेल्या डॉ. अनिल बोरगे यांनी मनपाचे प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्या पदावर काय काय करून थेट सरकारकडून आपली कायम नियुक्ती करून आणली. त्यात रक्तपेढीच्या व्यवस्थापनाकडे डॉ. बोरगे यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले. त्यांना प्रभारी नियुक्ती दिली असली तरीही रक्तपेढीचे मुख्य काम सांभाळून त्यांना प्रभारी काम करणे अपेक्षित होते. तसे होत नसल्याने रक्तपेढीची दुरवस्था झाली. तिथे कोणी प्रमुख नियुक्त करावे एवढेही भान मनपाला राहिले नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या येथील कार्यालयाने रक्तपेढीची पाहणी केली व कामकाज सुधारावे म्हणून नोटीस दिली. त्याकडे लक्ष दिले गेले नाही म्हणून पुन्हा नोटीस दिली. तीन दिवसांसाठी परवाना रद्द केला. तरीही कामकाज सुधारले नाही, म्हणून पाहणी, तपासणी केली. त्यात अनेक दोष आढळले, त्यातून मग परवाना रद्द करण्याचीच कारवाई झाली व पदाधिकाऱ्यांसह सगळे प्रशासन मग खडबडून जागे झाले. त्यानंतर महापौरांनी मुंबईला संबंधित मंत्रालयात जाऊन कशीबशी स्थगिती मिळवली. त्यांनी इमारत दुरूस्त करण्याचा, तसेच रक्तपेढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व अटी पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्यात वातानुकूलन यंत्र, रक्तपिशव्यांसाठी फ्रिज याचा समावेश होता. रक्तपेढीचा परवाना कायमचा रद्द झाला तर शहरातील गरीब, गरजू रुग्णांचे हाल होतील तसेच अनेकांचा रोष सहन करावा लागेल हे लक्षात घेऊन पदाधिकारी व प्रशासनाने लगेचच रक्तपेढीच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. आता ते जवळपास पूर्ण होत आले आहे. सर्व प्रकारची अद्ययावत उपकरणे, तसेच ३ फ्रिज, ३ वातानुकूलन यंत्र असे बरेच काही प्रशासनाने खरेदी केले आहे. या सर्व कामकाजासह सविस्तर माहिती अन्न औषध प्रशासनाकडे पाठवण्यात आली असून आता लवकरच परवाना पुन्हा दिल्याचा आदेश मिळेल, असा विश्वास महापौर व आयुक्तांनी व्यक्त केला. त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक संजय चोपडा, बाळासाहेब बोराटे, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, शहर अभियंता नंदकुमार मगर, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. वृषाली पाटील, डॉ. श्रीमती कुलकर्णी आदी होते.