येथील यशश्री महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यातही महिला रक्तदात्या आघाडीवर होत्या.
 येथील पठाणपुरा मार्गावरील जैन भवनात २९ मार्च रोजी झालेल्या या रक्तदान शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते किशोर जोरगेवार होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.श्याम धोपटे, तर प्रमुख पाहुणे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.अनंत हजारे, ज्येष्ठ रक्तदाते सत्यनारायण तिवारी, महापौर संगीता अमृतकर, डॉ.अंजली आंबटकर, डॉ.प्रेरणा कोलते व डॉ. श्रीकांत वाघ, यशश्री महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमा रेभणकर उपस्थित होत्या. सर्वप्रथम जोरगेवार यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले. जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रक्तपेढय़ांनाही रक्ताची टंचाई निर्माण झाली असून अशा शिबिराच्या माध्यमातून या रक्तपेढय़ांना रक्त पुरवठा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. अनंत हजारे यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तपेढय़ांची रक्ताची गरज पूर्ण होते. शिबिरातून गोळा होणारे रक्त सर्वसामान्य गरीब व गरजू व्यक्तींना देण्यात येते असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रा.धोपटे यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. या शिबिरात एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिला रक्तदात्या आघाडीवर होत्या. रक्तदान शिबिरासोबतच गोविंदस्वामी मंदिरात सायंकाळी आनंद मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमासाठी यशश्री महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमा रेभणकर, वैशाली कामडे, किरण इंदापवार, माया कडते, रेशमा आत्राम, मंगला येनूरकर, उज्वला येरणे, ज्योती येरणे, अर्चना अंतुरकर, संगीता बलकी, सुनीता येनगंटीवार, चेतना जुमडे, सोनाली पुरानकर, वैशाली येरणे, प्राजक्ता हिवरे यांनी परिश्रम घेतले. दोन्ही कार्यक्रमांचे संचालन स्मिता रेभणकर यांनी केले.