गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी २६ डिसेंबरपासून जीवनअमृत योजना कार्यान्वित झाली आहे. त्याची पुरेशी तयारी न केल्यामुळे या योजनेची वाटचाल खडतर दिसते आहे.
लातूर जिल्हय़ातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाइकांनी मोफत दूरध्वनी क्रमांक १०४वर मदतीसाठी संपर्क करावयाचा आहे. एखाद्या रुग्णास नìसग होम किंवा रुग्णालयात दाखल असताना रक्ताची आवश्यकता असेल त्या वेळी या योजनेंतर्गत जिल्हा रक्तपेढीकडे संबंधित यंत्रणेने नोंदणी करणे आवश्यक आहे. रक्ताची नोंदणी केल्यानंतर रक्तपेढी केंद्रापासून नìसग होम केंद्रापर्यंत मोटारसायकलवरून शीत साखळीद्वारे एक तासाच्या आत ४० किलोमीटर अंतरापर्यंत रक्तपुरवठा केला जाईल. रक्त पिशवीची किंमत ४५० रुपये व वाहतुकीचा अतिरिक्त खर्च रुग्णास द्यावा लागणार आहे. योजनेचा बाहय़स्वरूप पाहता ही योजना अतिशय चांगली आहे. मात्र एखाद्या गरजू रुग्णाने रक्ताची नोंदणी केल्यास रक्तपेढीतून संबंधित रुग्णालयात जाऊन गरजूचे रक्त आणून ते तपासून घेतले जाईल. रक्तपेढीत असलेल्या रक्ताशी ते जुळते की नाही हे पाहिले जाईल व त्यानंतर संबंधित रुग्णाला रक्त दिले जाईल. यासाठी किमान ३ तासांचा वेळ लागेल.
रक्त मिळवण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक रक्तपेढीपर्यंत पोहोचल्यावरही त्यांना ते उपलब्ध असूनही ते दिले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा काळात नव्या योजनेद्वारे तत्पर सेवा दिली जाईल, असा दावा अधिकारी करतात. रक्तपेढीत रक्तच जर उपलब्ध नसेल तर ते रुग्णांना कसे दिले जाईल, या प्रश्नाचे उत्तर मात्र अधिकाऱ्यांकडे नाही. जिल्हय़ाचा भौगोलिक विस्तार १५० किलोमीटर अंतराचा आहे. केवळ ४० किलोमीटर अंतरापर्यंत जीवनअमृत योजना राबवली जाते. शहरात खासगी रक्तपेढय़ाही अनेक आहेत. ज्या भागात रुग्णांना रक्त वेळेवर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे मत व्यक्त होत आहे.