विविध प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करीत असून फुलांच्या शेतीकडेही त्याने लक्ष केंद्रित केले आहे. विदर्भात नागपूर व अकोला जिल्ह्य़ातील शेतकरी फूल शेतीतून उत्पादन घेत असून विदर्भात हलक्या जमिनीवरही हरितगृहातील फूल शेतीस चांगला वाव आहे.
कृषी उत्पादनात राज्याने देशाच्या नकाशावर स्थान मिळविले आहे. आतापर्यंत काही निवडक जिल्ह्य़ांमधील शेतकरीच  फूल शेती करीत होते. हरितगृहामुळे आता इतर जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांनाही हा पर्याय खुला झाला आहे. हरितगृहे उभारून फूल शेती करण्यामध्ये लहान शेतकऱ्यांचाही सहभाग आहे. विदर्भात नागपूर व अकोला जिल्ह्य़ांमध्ये हरितगृहातील फुलांची शेती केली जात आहे. नागपूर जिल्ह्य़ात जवळपास अडीचशे हेक्टर क्षेत्रामध्ये फूल शेती केली जात आहे. यामध्ये नागपूर, कामठी, हिंगणा, भिवापूर, काटोल व कुही या सहा तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मोठय़ा शहराला लागून असलेल्या क्षेत्रामध्ये फूल शेती करणे शेतक ऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. काटोली तालुक्यात ९४ हेक्टर, नागपूर ४९ हेक्टर, कामठी २२, हिंगणा १५, भिवापूर २३२ व कुही तालुक्यात २३ हेक्टरमध्ये फूल शेती केली जात असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी सांगितले.
सण आणि उत्सवाच्या वेळी शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेत फुलांना चांगली मागणी असते आणि भावही चांगला मिळत असल्याने ही शेती करण्यासाठी विदर्भात चांगला वाव आहे. शोभिवंत फूल झाडांच्या प्रजातीत पाम, क्रोटन, स्टारलय, फायक्स, अशोका, रबर प्लान्ट, मनी प्लान्ट इत्यादी पन्नासपेक्षा अधिक झाडांचा समावेश आहे. फुलांमध्ये गुलाब, फोरलिनिया, मोगरा, पिटोनिया, जास्वंद चाफा, मोगरा, गौरी चाफा, टिपू आदी प्रकार बाजारपेठेत विक्रीला आहेत. दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धतीने फूल शेती केली जात असून झेंडू, गुलाब, निशीगंध, मोगरा, शेवंती, जरबेरा या फुलांचे उत्पादन घेतले आहे. हवामान, पाण्याची उपलब्धता व लागवडीस उपयुक्त असलेली उपलब्ध जमीन यावर या शेतीचे उत्पादन अवलंबून आहे. हलक्या जमिनीवरही आता नवीन तंत्रज्ञानाने फुलांचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. राज्यामध्ये सुमारे ३९ फूल उत्पादन कंपन्यांनी निर्यातक्षम फुलांचे उत्पादन करण्यासाठी नोंदणी केली असून १४ कंपन्या निर्यातक्षम फुलांचे उत्पादन घेत आहेत. प्रामुख्याने गुलाबाच्या प्रजातींचेच अधिक उत्पादन घेतले जाते आहे. या कंपन्या दरवर्षी २६० दशलक्ष फुले उत्पादित करून निर्यात करीत आहेत. शेतक ऱ्यांना फूल शेतीमध्ये आवड निर्माण करण्यासाठी अपांरपरिक व पारंपरिक फुलांच्या लावगडीसाठी शासनाकडून अर्थसाह्य़ देण्यात येत आहे. फूल पिकांची कंदापासून, कलमांपासून व बियाण्यांपासून लागवड करण्यासाठीही शासनाकडून अर्थसाह्य़ दिले जात आहे.