शिवाजी पार्क असो वा धारावीशी स्पर्धा करणारे दहिसरमधील गणपत पाटील नगर, किंवा मग पुनर्विकासाचे प्रस्ताव असोत वा क्षयरोग्यांचे प्रश्न. नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांबाबत नगरसेवकांनी पालिका सभागृहात आयुक्तांना जाब विचारला. परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर आयुक्त आजतागायत देऊ शकलेले नाहीत. अर्थात एकाही आयुक्ताने या प्रश्नांची उत्तरे आजवर दिलेली नाहीत.
शिवाजी पार्क हे मनोरंजन उद्यान की खेळाचे मैदान हा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवर त्यांचे स्मारक उभारण्याचा हट्ट शिवसेनेने धरला. परंतु स्मारकाचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. मे २००० मध्ये सूर्यकांत बाईत यांनी शिवाजी पार्कची माहिती देण्याची मागणी पालिका सभागृहात केली होती. परंतु १३ वर्षे लोटली तरी त्यांना आयुक्तांकडून उत्तर मिळालेले नाही. पवई तलाव परिसरातील फिल्टर पाडा, साकी विहार रोड, शंकर मंदिर उद्यानाच्या शेजारील रेनेसाँ या पंचतारांकित हॉटेलविषयी गौतम साबळे यांनी जानेवारी २००९ मध्ये आयुक्तांकडे माहिती मागितली होती. तीही आजतागायत देण्यात आलेली नाही.
शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी सप्टेंबर २०१२ मध्ये पालिकेतील इमारत प्रस्ताव विभागाने २००७ पासून २०११ पर्यंत खासगी विकासकांना किती इमारती बांधण्याची परवानगी दिली, २००५ पासून २०१० पर्यंत किती पुनर्विकासाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले याची माहिती देण्याची विनंती केली होती. परंतु ही माहिती आजतागायत त्यांना मिळालेली नाही. तसेच गेल्याच महिन्यात त्यांनी वर्षां संचय व विनियोग योजनेची माहितीही मागितली आहे. नगरसेवक दीपक पवार यांनी क्षयरोग रुग्ण व रुग्णालयांची, तसेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनांमुळे होत असलेल्या पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या गळतीची माहिती देण्याची विनंती केली होती. धारावीशी स्पर्धा करणाऱ्या दहिसरच्या अनधिकृत गणपत पाटील नगराविषयी नगरसेविका अभिषेक घोसाळकर यांनी माहिती मागविली होती. परंतु त्यांनाही अद्याप माहिती मिळालेली नाही. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या अशा अनेक प्रश्नांना आजतागायत उत्तरे मिळालेली नाहीत. आजघडीला नसलेल्या नगरसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे अधूनमधून सभागृहात सादर केली जातात. परंतु ती उपस्थित केलेली व्यक्तीच सभागृहात नसल्याने त्यावर काहीच होत नाही.
गेल्या अनेक वर्षांमध्ये पालिका आयुक्तपद अनेक अधिकाऱ्यांनी भूषविले. परंतु मुंबईचे विश्वस्त असलेल्या नगरसेवकांच्या प्रश्नांना वेळच्या वेळी उत्तर देण्यास एकालाही वेळ मिळाला नाही. तीच प्रथा आता सीताराम कुंटे यांच्या कारकिर्दीतही सुरूच आहे.