मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले मदतीचे आश्वासन आणि पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसी बळाच्या वापराचा दिलेला इशारा यामुळे अखेर अनधिकृत सदनिकांवर कारवाई करण्यासाठी वरळीच्या कॅम्पा कोला कम्पाऊंडचे प्रवेशद्वार रहिवाशांनी सोमवारी खुले केले. बेस्ट आणि महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमवेत पालिका अधिकाऱ्यांनी कॅम्पा कोलात पाऊल टाकले आणि रहिवाशांची हतबलता चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. कर्मचाऱ्यांनी एकेका इमारतीतील अनधिकृत सदनिकांची वीज तोडण्यास सुरुवात केली. पाणीपुरवठाही रोखण्यात आला. आपल्या घराची ही अवस्था पाहून कॅम्पा कोलावासीयांना अश्रू अनावर झाले.
पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी कम्पाऊंडमध्ये प्रवेश द्यायचाच नाही, या निर्धारानेच कॅम्पा कोलाचा दिवस उजाडत होता. पण रविवारी पालिका अधिकाऱ्यांनी दिलेला इशारा आणि मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्वासन दिले आणि संध्याकाळी रहिवासी संभ्रमात पडले. अखेर पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करू द्यावे यावर रहिवाशांचे एकमत झाले. मात्र, सोमवारी सकाळीही रहिवाशांच्या चेहऱ्यावरची काळजी आणि सरकारबद्दलची नाराजी स्पष्ट दिसत होती. रहिवासी गटागटाने चर्चा करीत होते. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला खरा, पण मदत केली नाही तर? अशी कुजबुजही सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून कारवाई करू देण्यास रहिवाशांनी अनुकूलता दर्शविली असली तरी सोमवारी सकाळपासून कॅम्पा कोलाची दोन्ही प्रवेशद्वारे बंदच होती. केवळ रहिवासी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच छोटय़ा दरवाजातून प्रवेश दिला जात होता. कारवाईसाठी अधिकारी येणार आणि त्यांना विरोध न करता कारवाई करू द्यायची आहे, या विचारानेच अनेक जण कासावीस झाले होते.
सोमवारची सकाळ उजाडताच रहिवाशांमध्ये प्रचंड चलबिचल सुरू होती. द्विधा मन:स्थिती असलेले काही रहिवासी गोंधळलेलेच होते. पालिका अधिकाऱ्यांना प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत त्यांच्या मनात द्वंद्व सुरू होते. परंतु प्रवेश देण्यावाचून पर्यायच नव्हता. त्यामुळे एकमेकाची समजूत काढत रहिवासी पालिका अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते. अखेर सकाळी ११ च्या सुमारास पालिका अधिकारी कॅम्पा कोलाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. प्रवेशद्वाराला भलेमोठ्ठे कुलूप ठोकलेले होते.
‘तुम्ही नेमकी कोणती कारवाई करणार?’ असा सवाल प्रवेशद्वाराच्या आत उभ्या असलेल्या महिलांनी केला. एकीकडे वृत्तवाहिन्यांच्या छायाचित्रकारांची छायाचित्रणासाठी धावपळ सुरू होती, तर दुसरीकडे पालिका अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांची तारेवरची कसरत करीत होते. केवळ वीज, पाणी आणि गॅसपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पटवून दिले. त्यानंतर कॅम्पा कोलाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडण्यात आले.
अधिकाऱ्यांपाठोपाठ पालिका, बेस्ट आणि महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी आपापली अवजारे सोबत घेऊन कॅम्पा कोलात प्रवेश करते झाले. आत गेल्या गेल्या अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आणि तीन पथके तयार करण्यात आली. बेस्ट कर्मचाऱ्यांनी शुभ अपार्टमेन्टमधील वीज मीटर रूमचा ताबा घेतला आणि एकेका अनधिकृत सदनिकेचा विद्युतपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अन्य दोन पथकांनी बी वाय अपार्टमेन्ट आणि पटेल अपार्टमेन्टमधील बी विंगमधील अनधिकृत सदनिकांची वीज मीटर कापण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ पालिका कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा खंडित करण्याचे कामही सुरू केले आणि रहिवासी मात्र खिन्न मनाने आपल्या घरांवर होणारी कारवाई पाहत होते.