News Flash

पालिकेच्या बारा कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाला दांडी

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी नवी मुंबई पालिकेच्या बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाला दांडी मारल्याची तक्रार साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.

| March 27, 2014 08:53 am

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी नवी मुंबई पालिकेच्या बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाला दांडी मारल्याची तक्रार साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. निवडणूक कामासाठी जात असल्याचे सांगून हे अधिकारी-कर्मचारी पालिकेतून सुट्टी घेत होते, पण ते प्रत्यक्ष निवडणूक कामाला जात नसल्याचे आढळून आले आहे. कामाचे वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर उभे राहिल्यास कमी कष्टाचे काम पदरात पडत असल्याचा अनुभव असल्याने हे सराईत दांडीबहाद्दर कर्मचारी निवडणूक कामाला जात नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न असून शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांची कुमक मागवली जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर पालिकेसह जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मागविण्यात आले आहेत. नवी मुंबई पालिकेतील ही संख्या २०० कर्मचाऱ्यांची आहे. या कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. नवी मुंबई पालिकेतील हे कर्मचारी रीतसर निवडणुकीच्या कामात हातभार लावत असताना यातील बारा कर्मचाऱ्यांचा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्ता लागत नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आढळून आले. यात पालिकेच्या अभियंता विभागातील दोन अभियंते असून आरोग्य केंद्र व मुख्यालयातील लिपिकांचा समावेश आहे. निवडणुकीच्या कामाला जात आहे असे सांगून वरिष्ठांकडून सुट्टी घ्यायची आणि प्रत्यक्ष कामाला न जाता दांडी मारायची अशी या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाची पद्धत आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत पालिका प्रशासनाला एक पत्र देऊन याची गंभीर दखल घेतल्याचे कळविले आहे. पालिका प्रशासनानेही निवडणूक अधिकाऱ्यांच्या त्या पत्राची तात्काळ दखल घेऊन या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीच्या काळात निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर राहिल्यास हे अधिकारी कष्टाचे काम लावत असल्याने पहिले काही दिवस दांडी मारून नंतर हजर राहण्याची एक पद्धत या अधिकारी-कर्मचाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे निवडणुकीतील कामांचे वाटप होईपर्यंत हे अधिकारी गैरहजर राहतात. त्यामुळे नंतर कमी कष्टाचे किंवा काम न लागण्याचे सुख या कर्मचाऱ्यांच्या पदरात पडत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय काम मानले गेल्याने त्याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तरतूद आहे. पण या कर्मचारी-अधिकाऱ्यांना समज देऊन कामावर तात्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 8:53 am

Web Title: bmc employees bunk election duty
Next Stories
1 वाशी सेतू कार्यालयातील कामकाज ठप्प
2 पथदिवे बंद : रोडपालीतील नागरिकाची ‘अंधारी वाटचाल’
3 दास्तान ते गव्हाणफाटा दरम्यान अनधिकृत पार्किंग
Just Now!
X