पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे असल्याचे कारण देत पाच वर्षांपूर्वी गाजावाजा करत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यावर भर देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या या वाघिणीच्या दुधाकडेही विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आतापर्यंत वाढत असलेली इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी नोंदणी कधी नव्हे ती कमी झाली आहे.
प्रजा फाऊंडेशनने पाहणी आणि माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या पालिका शाळांवरील अहवालात हे सत्य समोर आले आहे. या अहवालात पालिका शाळेतील शैक्षणिक दर्जा, पालकांचा अविश्वास, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रशासन आणि नगरसेवकांची उदासीनता आदी कारणांमुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या अहवालातील इतर इयत्तांमध्ये दरवर्षी होणाऱ्या नोंदणी पाहता पालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळेतील एकूण नोंदणी १.२ टक्क्य़ांनी वाढलेली दिसते. पण २००९ ते २०१४ या काळात पालिकेच्या विविध माध्यमांमध्ये इयत्ता पहिलीला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यात २०१२-१३ पर्यंत इंग्रजी वगळता सर्वच माध्यमाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी आधीच्या वर्षांच्या तुलनेत कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तोपर्यंत या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी दोन ते पाच टक्क्य़ांनी वाढत होती. दुर्दैवाने २००९-१० मध्ये तब्बल ४०.६ टक्क्य़ांवर असलेले इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थी नोंदणीचे प्रमाण कमी कमी होत २०१३-१४ मध्ये -९.१ टक्क्य़ांवर आलेले दिसते. म्हणजे आता असे चित्र आहे की गरीब किंवा निम्नवर्गातील पालकांना जरी इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्याला शिकवायचे असले तरी त्यांना पालिका शाळेतून चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल याची खात्री वाटत नाही आहे, अशी प्रतिक्रिया प्रजाचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.
याचे कारण पालिकेच्या इंग्रजी शाळांमधील शिक्षक : विद्यार्थी या प्रमाणाकडे पाहिले तरी सहज दिसून येईल. इतर माध्यमाच्या शाळांमध्ये एका शिक्षकामागे २२(मराठी), ३७ (हिंदी,उर्दू), २२(कन्नड), २५(तेलगू) असे प्रमाण असताना इंग्रजी शाळांमध्ये ते ४४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे आहे. याचा परिणाम निश्चितच या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असणार. कारण आधीच शिकण्याचे माध्यम मातृभाषा नाही. त्यातून या शाळांमध्ये शिकायला येणारे विद्यार्थी गरीब किंवा निम्न मध्यवर्गीय कुटुंबातील. या विद्यार्थ्यांना इंग्रजीसारख्या परकीय भाषेत शिकायचे तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षकाने जातीने लक्ष द्यायला हवे. सध्या काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इंग्रजी शाळांमध्ये शिकविले जाते आहे. परंतु पूर्णवेळ शिक्षकाची कसर या संस्था कशा भरून काढणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ माध्यम इंग्रजी करून चालणार नाही तर काही दर्जेदार खासगी शाळा ज्याप्रमाणे प्रयत्न करतात तशी मेहनत विद्यार्थ्यांवर पालिकेला घ्यावी लागेल.
सातवीतले केवळ ३३ टक्के विद्यार्थी आठवीत
पालिकेच्या शाळेमध्ये पुढच्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही प्रत्येक शैक्षणिक वर्षांगणिक घटत असल्याचे दिसून येते. त्यापैकी सर्वात कमी प्रमाण (केवळ ३३टक्के) हे सातवीतून आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहे. याला कारण पालिकेकडे आठवी ते दहावीच्या शाळांची असलेली कमी संख्या हे एक मोठे कारण आहे. परंतु पहिली ते सातवीपर्यंतच्या प्राथमिक स्तरावरही विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. उदाहरणार्थ २००९-१०ला पहिलीत प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल २१ टक्के विद्यार्थी पाचवीपर्यंत पोहोचले नव्हते.