वाहतुकीचा घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी पदपथांचा लचका तोडून रस्ता रुंद करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. मात्र त्यामुळे वर्षांनुवर्षे पदपथावर डौलात उभी असलेली वृक्षवल्ली धोक्यात येऊ लागली आहे. दहिसरमध्ये पदपथाचे अरुंदीकरण करण्यात येत असून त्यात १२ वृक्ष गतप्राण होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नागरिकांनी केलेला विरोध डावलून पदपथाचे अरुंदीकरण मोठय़ा प्रमाणावर सुरू असून हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षित राहिला आहे.
दहिसर पश्चिमेला असलेल्या कांदरपाडा परिसरातील लक्ष्मण म्हात्रे मार्गावर वाहतूक कोंडी नेहमीच अनुभवास मिळते. या रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. वाहतुकीस आणि वाहने उभी करण्यास जागा मिळावी म्हणून या मार्गावरील पदपथ अरुंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकही खूश झाले.
लक्ष्मण म्हात्रे मार्गावरून रणरणत्या उन्हात ये-जा करणाऱ्यांना पदपथावरील वृक्षांच्या सावलीचा आधार मिळत होता; पण आता पदपथ अरुंदीकरणामुळे या वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिसर सुंदर दिसावा आणि पादचाऱ्यांना सावली मिळावी म्हणून या वृक्षांची लक्ष्मण म्हात्रे मार्गावर लागवड करण्यात आली होती. पाहता पाहता हे वृक्ष फोफावत गेले आणि सारा परिसर मनमोहक बनला. आता लक्ष्मण म्हात्रे मार्गावरील रिझव्‍‌र्ह बँक सोसायटी आणि दहिवली सोसायटीसमोर अरुंदीकरणात पदपथावरील वृक्ष रस्त्यावर आले आहेत. या वृक्षांभोवती दगडांचे कडे करण्यात आले असून वृक्षाच्या तळाशी माती राहील याची काळजी घेण्यात आली होती; परंतु पदपथाच्या अरुंदीकरणाच काम पूर्ण होताच उरलेले बांधकाम साहित्य आणि रस्ता खोदल्यानंतर शिल्लक राहिलेली दगड-माती या वृक्षांच्या बुंध्याशीच टाकून देण्यात आले. काही वृक्षांच्या बुंध्यालगत डांबर टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता वृक्ष धोक्यात आले आहेत. बांधकाम साहित्य आणि डांबर वेळीच दूर केले नाही तर हे वृक्ष फार काळ जगतील याची शाश्वती नाही.
ही कामे सुरू असताना स्थानिक नागरिक वारंवार कामगारांना वृक्षांची काळजी घेण्याची कळकळीने विनंती करीत होते. कामगारही मान डोलावून वृक्षांची काळजी घेण्याबाबत दुजोरा देत होते; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच आहे. कामे आटोपती घेताना याच कामगारांनी वृक्षांच्या बुंध्याजवळ उरलेले बांधकाम साहित्य, खणलेल्या रस्त्याची माती आणि डांबर टाकून हात झटकले आहेत. आता याच मार्गाच्या पुढील भागातील पदपथ अरुंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तेथील वृक्षांचीही अशीच विल्हेवाट लागणार आहे. हळूहळू या मार्गावरील वृक्षवल्ली लोप पावून रस्ता बोडका होण्याची चिन्हे आहेत. पदपथ अरुंदीकरणामुळे वाहतुकीचा रस्ता मोठा झाला, आता वाहतूक कोंडीतून वाहनांना मार्ग मोकळा होईल, वाहने उभी करण्यासाठी जागाही उपलब्ध होईल; पण प्रदूषणमुक्त करणारे हे वृक्ष मात्र नसतील. त्याकडे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष ना प्रशासनाचे.
प्रसाद रावकर, मुंबई