शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांना या उकाडय़ापासून दिलासा मिळावा यासाठी प्रत्येकजण पावसाच्या प्रतीक्षेत असताना पावसाळ्यातील आजारांना तोंड देण्यासाठी मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पावसाळ्यात रोगांची लागण होऊ नये म्हणून काही उपाय या विभागाने योजले आहेत. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच काही नाल्यांची सफाई करून घेतली असून काही नाल्यांच्या सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नागनदी, पिवळी नदी, चांभार नाला, हत्तीनालासह शहरातील नाल्यातील गाळ, वाळू, झाडे, झुडपे काढण्यात आली. शहरातील मध्यम व मोठय़ा नाल्यांची संख्या २२० आहे. त्यात गड्डीगोदाममधील हत्ती नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबी नाला, लाकडी पूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाल्याचा समावेश आहे. महापालिकेने यंत्राच्या मदतीने नाल्यांतील गाळ काढला. महापालिकेने सर्वच झोनमधील नाल्यांच्या सफाईचे काम १ मेपासूनच सुरू केले आहे. यावेळी पिवळी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. नागनदीची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. ज्या वस्त्यामध्ये किंवा खोलगट भागात पाणी साचले जाते त्या भागात डांबरीकरण करून पाणी नाल्यात कसे जाईल याची व्यवस्था केली जात आहे. पावसाळ्यात अनेक खोलगट भागात पाणी साचल्यामुळे डांसाची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होते त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढते त्यामुळे अशा ठिकाणी आधीच फवारणी मारून ती जागा स्वच्छ करण्याचे काम सुरू केले नाही. कीटकजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास रक्तजलाची तपासणीची व्यवस्था सेंट्रीनल सेंटर, मेडिकल, मेयो रुग्णालयात करण्यात आली आहे. डेंग्यू, चिकन गुनिया, चंडिपुरा, मेंदुज्वर, हिवताप, हत्तीरोग आदी कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत असून हत्तीरोग विभागाचे कर्मचारी घरी आल्यास त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी केले आहे.

अशी काळजी घ्या..
ल्ल  कीटकजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.
ल्ल सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावा, शक्य झाल्यास पाण्यावर रॉकेल टाका.
ल्ल आठवडय़ातून एक दिवस ड्राय डे पाळा, भांडे, टाक्या, माठ  रिकामे करून कापडाने कोरडे करा.
ल्ल  पाण्याच्या टाक्यांची झाकणे बंद ठेवा, घरात नियमित कीटकनाशकांची फवारणी करा.
ल्ल डासअळी नाशकाची महापालिकेकडून फवारणी करवून घ्या.
ल्ल आजाराची लक्षणे दिसताच रक्ततपासणी करून औषधोपचार करून घ्या.