क्षेपणभूमीची क्षमता संपुष्टात आल्यामुळे मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवी मुंबईजवळील तळोजा येथे जागा उपलब्ध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत पालिका अधिकाऱ्यांच्या दोन बैठका पार पडल्या. परंतु पालिकेला जागा देण्याबाबत अद्यापही सरकारने हिरवा कंदील दाखविलेला नाही. परिणामी तळोजातील जागेकडे पालिका अधिकारी डोळे लावून बसले आहेत.
मुंबईमध्ये दर दिवशी निर्माण होणाऱ्या आठ हजार टन कचऱ्याची देवनार, कांजूर आणि मुलुंड येथील क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावण्यात येत होती. यापैकी देवनार क्षेपणभूमीची क्षमता संपुष्टात आली असून ही क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची गरज आहे; तर कांजूर आणि मुलुंड क्षेपणभूमीबाबत वाद निर्माण झाला आहे. परिणामी मुंबईमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतील कचरा टाकण्यासाठी तळोजा येथील १२६ हेक्टर जागा एमएमआरडीएने पालिकेला द्यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा बैठका बोलावून पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी पालिकेला तळोजा येथील जागा देण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही ही जागा पालिकेला मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईमधील वाढत्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला असून त्याची विल्हेवाट कुठे लावायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.