मुंबईमध्ये पावसाने जोर धरताच पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा अतिधोकादायक इमारतींची गंभीर दखल घेतली आहे. रहिवाशांनी या इमारती तात्काळ रिकाम्या कराव्यात यासाठी त्यांना आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने पाहणी करून मुंबईतील ५४२ इमारती अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले होते. ‘सी-१’ गटामध्ये समावेश करण्यात आलेल्या या इमारती कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. शहरातील ७४, पश्चिम उपनगरातील २३०, तर पूर्व उपनगरातील २३८ इमारतींचा त्यात समावेश आहे. सर्वाधिक अतिधोकादायक इमारती कुर्ला परिसरात असून त्यांची संख्या ११६ इतकी आहे. त्याचबरोबर ‘सी-२’ आणि ‘सी-३’ गटामध्येही काही इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. ‘सी-२’ गटातील इमारतींची मोठय़ा प्रमाणावर, तर ‘सी-३’ गटातील इमारतींची छोटी-मोठी दुरुस्ती करण्याची सूचना पालिकेकडून संबंधितांना करण्यात आली आहे.  महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४ नुसार प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारत रिकामी करण्याबाबत रहिवाशांवर नोटीस बजावली होती. इमारत सात दिवसांमध्ये रिकामी करण्यात यावी, असे नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले होते. मात्र तरीही रहिवाशांनी अद्याप इमारत रिकामी केलेली नाही. पालिकेतर्फे संक्रमण शिबिरात घर उपलब्ध करूनही रहिवासी तेथे जायला तयार होत नाहीत. पर्यायी घर दूर असल्याची अथवा अन्य कारणे ते पुढे करतात आणि धोका पत्करून मोडकळीस आलेल्या इमारतीत राहतात, असे एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये वास्तव्य करणे रहिवाशांसाठी अत्यंत धोकादायक आहे. रहिवाशांनी पालिकेला सहकार्य करावे आणि अतिधोकादायक इमारत रिकामी करावी. त्यासाठीच आम्ही पुन्हा एकदा या इमारतींमधील रहिवाशांना शुक्रवारपासून नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.
– अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख