पालिकेच्या रिंगरूटसाठी प्रस्तावित असलेला डोंबिवलीतील ठाकुर्ली, शिवाजीनगर ते गावदेवी भागातील रस्त्याची सीमारेषा २५ ते ३० मीटरने स्थलांतरित करण्यात आली आहे. या रिंगरूटसाठी यापूर्वी ज्या जमीन मालकांनी जमिनी देऊन टीडीआर व मोबदला घेतला त्या जमीन मालकांच्या घर, भूखंडावर रिंगरूटच्या हद्दी दाखविण्यात आल्याने जमीन मालकांनी संताप व्यक्त केला आहे.
१९९६ मध्ये पालिकेची विकास योजना मंजूर झाल्यानंतर त्यामधील सेक्टर पाच मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यावेळी रिंगरूटसाठी जमीन मालकांनी मोबदला घेऊन जमिनी हस्तांतरित केल्या आहेत. मग सतरा वर्षांनंतर आमच्या घरादारांवर रिंगरूटच्या सीमा-हद्दी आणण्याचे पाप कोणी केले याचा शोध घेण्यात यावा. २५ ते ३० मीटरने रिंगरूटची सीमारेषा अन्यत्र स्थलांतरित करून काही शुक्राचार्यानी स्थानिक भूमिपुत्रांना बेघर करण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी तक्रार काशीनाथ भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
आपण स्वत: या रिंगरूटसाठी जमीन उ़पलब्ध करून दिली आहे. हा पुन्हा त्रास शेतकऱ्यांना कशासाठी असा प्रश्न भोईर यांनी केला आहे. १९९६ च्या विकास आराखडय़ाप्रमाणे रिंगरूटसाठी सर्वेक्षण करण्यात यावे व भूसंपादनाची प्रक्रिया करावी अशी मागणी जमीन मालकांनी केली आहे. मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांनीही अशाचप्रकारची तक्रार आयुक्तांकडे देऊन जमीन मालकांवर कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
काही विकासकांचे हित साधण्यासाठी पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी हा उद्योग केला असल्याची चर्चा जमिन मालकांमध्ये सुरू आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2013 7:04 am