News Flash

रस्त्याच्या कामांची उरकाउरक

रस्तेदुरुस्ती २० मेपर्यंत पूर्ण करण्याची तयारी महापालिकेने न्यायालयात दर्शवली खरी परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणची कामे अर्धवट असून ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी आता पालिका

| May 22, 2014 01:03 am

रस्तेदुरुस्ती २० मेपर्यंत पूर्ण करण्याची तयारी महापालिकेने न्यायालयात दर्शवली खरी परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणची कामे अर्धवट असून ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी आता पालिका अधिकाऱ्यांची घाई सुरू झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांनीही कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या घाईगर्दीमुळे रस्त्याच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ही कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याची मुभा कंत्राटदारांना देण्यात आली असली तरी नव्याने खोदकाम त्यांना करता येणार नाही.  गेल्या पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन शहरातील यंदा ९३७ रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचा घाट घालण्यात आला. त्यासाठी स्थायी समितीची मंजुरीही मिळवण्यात आली. निविदा प्रक्रिया व आलेल्या प्रस्तावांना मंजुरीसाठी लागलेला उशीर या मुळे फेब्रुवारीअखेरीस रस्त्याच्या कामांचे कार्यादेश कंत्राटदारांच्या हाती पडले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली मार्च महिन्यात. अनेक रस्त्यांची कामे एकाचवेळी हाती घेण्यात आल्याने नियोजन फसले आणि परिणामी वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. केवळ कार्यालयीन वेळाच नव्हे तर भर दुपारीही रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आणि त्याचा थेट मुंबईकरांना फटका बसला. कार्यादेश हाती पडताच कंत्राटदारांनी झपाटय़ाने कामे सुरू केली, पण पुढे कामातील कासवगती मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरली.
पालिकेला मात्र विश्वास
मार्चमध्ये ९३७ पैसी ४८४ रस्त्यांची कामे सुरू झाली आणि आता त्यापैकी १६४ कामे पूर्ण झाली आहेत. ३२० रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास पालिकेला वाटत आहे. ही कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अर्धवटच झालेली आहेत. पावसाळ्यात मुंबईकरांचा रोष ओढवू नये यासाठी खोदलेल्या रस्त्यांची कामे घाईगडबडीत उरकण्यात येत आहेत.

मरिन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गही अर्धवट कामांच्या यादीत अडकला आहे. या ब्रिटिशकालीन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला तडे गेले होते. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे तंत्रज्ञान पालिकेकडे नसल्याने काही वर्षांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर करण्यात आला. त्यामुळे हा रस्ता डांबराचा की सिमेंट काँक्रिटचा असा प्रश्न पादचारी आणि वाहनचालकांना पडला होता. या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे शक्यच नसल्याने आता त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि मार्चमध्ये या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. इतर रस्त्यांप्रमाणेच याही रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. काही ठिकाणी खोदलेल्या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची धावपळ सुरू आहे. एका बाजूचा निम्म्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे, तर दुसरा भाग दुरुस्तीचा प्रतीक्षेत आहे.

पावसाळा जवळ आल्यामुळे पालिकेने ९३५ पैकी सुमारे ५० टक्के रस्त्यांची कामे हाती घेतली. परंतु त्यापैकी २० टक्के कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हाती घेतलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना दिले आहेत.
     पालिकेतील एक अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 1:03 am

Web Title: bmc road work deadline extended till 5th june
टॅग : Bmc
Next Stories
1 बांधकामाच्या हव्यासात नाला गायब
2 ५० तासांचा अभ्यास पाच तासांत!
3 पेन-पेन्सिलीही ‘नमो’ मय
Just Now!
X