20 September 2020

News Flash

आता न्यायालयाच्या दरवाजावर थाप! सुरक्षा रक्षक घोटाळा

तक्रारदाराने उपलब्ध केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर चार उमेदवारांना बाद ठरवून घोटाळा झालाच नाही असा कांगावा करीत निवड झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे.

| February 8, 2014 12:15 pm

तक्रारदाराने उपलब्ध केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर चार उमेदवारांना बाद ठरवून घोटाळा झालाच नाही असा कांगावा करीत निवड झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. तर प्रशिक्षणस्थळी सुरक्षा रक्षकांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी तब्बल ४० टक्के अधिक दराने कंत्राट देऊन स्थायी समिती अध्यक्षांनीही सुरक्षा रक्षक भरती घोटाळ्यातील आणखी एका घोटाळ्यावर पांघरूण घातले आहे. यामागे अर्थातच शेवाळे यांचे ‘अर्थपूर्ण मतपरिवर्तन’ झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता निवड झालेल्यांपैकी प्रशिक्षणास न आलेल्या १८० जणांच्या जागेवर अन्य काहींची वर्णी लावण्याचे घाटत आहे. यावरून सुरक्षा रक्षक भरतीमध्ये घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पालिका आयुक्त आणि पोलिसांकडून कोणतीच दाद मिळत नसल्यामुळे आता तक्रारदाराने याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षा रक्षक भरतीमध्ये उमेदवाराचा अर्ज आणि प्रत्यक्ष चाचणी घेतल्यावर अधिकाऱ्यांनी भरलेला चाचणी अहवाल यात तफावत आढळून आली आहे. याबाबतचे पुरावे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे सादरही करण्यात आले होते. परंतु सुरक्षा रक्षक विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत बेमालूमपणे हा घोटाळा दडवला. पुराव्यादाखल दिलेल्या चार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करून प्रशासनाने हात झटकले. घोटाळा उजेडात आल्यानंतर सर्व उमेदवारांचे अर्ज आणि त्यांच्या चाचणीच्या अहवालांची बारकाईने तपासणी करण्याची आवश्यकता होती. परंतु तसे करण्याऐवजी घोटाळा झालाच नाही, असा कांगावा प्रशासन करीत आहे.
या सुरक्षा रक्षकांना चार ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार असून तेथील भोजन व्यवस्थेसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु लघुत्तम निविदा असलेल्या कंत्राटदाराला सुरुवातीपासूनच डावलून द्वितीय क्रमांकावरील आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील होते. दस्तुरखुद्द स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी त्यास विरोध करीत समितीच्या तीन बैठकांमध्ये हा प्रस्ताव राखून ठेवण्याचे नाटक केले. मात्र अचानक अलीकडेच झालेल्या बैठकीत शेवाळे यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. राहुल शेवाळे यांच्या या अचानक झालेल्या मतपरिवर्तनाबाबत पालिकेत आता उच्चरवात चर्चा सुरू झाली आहे.भरती प्रक्रियेत निवड करण्यात आलेल्यांपैकी १८० उमेदवार प्रशिक्षणासाठी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागेवर काही जणांची वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. प्रतीक्षा यादीवरील १८० उमेदवारांना सेवेत घेण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात भरती प्रक्रियेदरम्यान प्रतीक्षायादीच बनविण्यात आलेली नाही. मग या १८० जणांच्या जागी नेमके कोणाला घेणार, असा सवाल आहे.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यापासून पोलिसांपर्यंत सर्वाकडे तक्रार केल्यानंतरही घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. आता निवड झालेल्या सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. तसेच घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय तक्रारदाराने घेतला आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक भरतीच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 12:15 pm

Web Title: bmc security guard recruitment scam now in court
Next Stories
1 ‘देश पोलिओमुक्त करण्यात ‘हाफकिन’ मुख्य आधारस्तंभ’
2 स्काऊट गाईड प्रशिक्षण स्थळाचा टप्प्याटप्प्याने विकास करणार
3 ज्याला हवे त्याला मिळणार ‘टिकीट टू बॉलिवूड’
Just Now!
X