बेकायदा आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाईचा बडगा उभारणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने आता याच फेरीवाल्यांचे नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. फेरीवाल्यांच्या धंद्याला शिस्त लावण्याच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पालिकेने एक समिती स्थापन केली असून ती तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालात फेरीवाल्यांसाठी ठरावीक वेळ संकल्पित करण्यात आली आहे.
फेरीवाले व पालिका यांच्यातील संघर्ष कायमस्वरूपी आहे. हा संघर्ष दूर करण्यासाठी फेरीवाला धोरण ठरवण्यात येत आहे. त्यापुढे जात पालिकेने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्राध्यापक व रचना संसदचे प्राध्यापक यांची समिती स्थापन केली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्राध्यापक फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणार असून रचना संसदचे प्राध्यापक फेरीवाले, नागरिक आणि पालिका यांच्या दृष्टिकोनातून नियोजन करणार आहेत.
विशेष म्हणजे या समितीने या आधी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यानाजवळील फेरीवाल्यांचे नियोजन केले आहे. त्यानंतर येथील फेरीवाल्यांबद्दलच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. तसेच फेरीवाल्यांनाही शिस्त लागली आहे. या समितीद्वारे फेरीवाल्यांचे नियोजन जागेनुसार आणि वेळेनुसार केले जाईल. त्याचप्रमाणे साप्ताहिक बाजारांचे आयोजन केले जाणार आहे. ठरावीक वस्तूंचे किंवा हंगामी बाजार यांचेही नियोजन करण्याची जबाबदारी या समितीवर असेल.