नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असताना वर्सोवा येथील सातबंगला समुद्रकिनाऱ्यावर गेली ४० वर्षे सुरू असलेल्या छोटय़ा मेथी शेतीवरही गंडांतर आले आहे. या परिसरातील काही नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने नुकतीच ही शेती बुलडोझर फिरवून उद्ध्वस्त केली. त्यामुळे ६० कुटुंबांच्या रोजीरोटीवर संक्रात आली असून परिसरातील छोटी मेथी विक्री बंद झाली आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील ओल्या वाळूवर गेली ४० वर्षे ६० कुटुंबे छोटया मेथीची शेती करीत आहेत. काही वर्षे पोर्ट ट्रस्टने त्यांच्याकडून भाडेही आकारले होते. ही कुटुंबे सागर कुटीर झोपडपट्टीत राहून या बीचवर एका बाजूला मेथी शेती करतात. भरतीच्या वेळी ओल्या होणाऱ्या वाळूवर ती केली जाते. ‘सेव्ह वर्सोवा बीच कमिटी’चा त्याला विरोध असून तक्रारींमुळे महापालिकेने बुलडोझर फिरवून या शेतीवर नुकतीच कारवाई केली. पण या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बीचच्या एका बाजूला ही शेती केली जाते व तिकडे कोणीही फिरायलाही येत नाही. त्याचा कोणालाही त्रास होत नाही व शेती असल्याने घाण होण्याचाही प्रश्न येत नाही.
सर्व बाजूंशी चर्चा करून मध्यम मार्ग काढण्यासाठी मुंबई भाजपच्या सचिव दिव्या ढोले यांनी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी दररोज सुमारे तीन ट्रक मेथीचे उत्पादन घेतले जाते व गेली ४० वर्षे ६० कुटुंबांची गुजराण होते. या जमिनीवर कोणताही हक्क त्यांनी सांगितलेला नाही. पण समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांना कोणताही त्रास न होता व सौंदर्याला कोणतीही बाधा न आणता या कुटुंबाची रोजीरोटी कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. अन्यथा ती देशोधडीला लागतील किंवा आत्महत्येसारखा पर्यायही निवडण्याची शक्यता आहे. परिसरातील शेकडो झोपडय़ा व अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या शेतकऱ्यांवर मात्र कारवाई केली जाते. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टूरिझम’च्या धर्तीवर या परिसराचे कसे सुशोभीकरण करता येईल, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ढोले यांनी सांगितले.
उमाकांत देशपांडे, मुंबई