क्षयरोगाच्या मृत्यूंबाबत महापालिकेकडून सादर होणारी आकडेवारी आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रावर आधारित ‘प्रजा फाऊंडेशन’चा दावा यात दिसणारी मोठी तफावत हा नेहमीच चच्रेचा व वादाचा मुद्दा झाला आहे. त्याबाबत होत असलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी महानगरपालिकाही आता अभ्यास व सांख्यिकीचा आधार घेण्यास सज्ज झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या काळात मृत्यू प्रमाणपत्रावर लिहिलेल्या क्षयरोगाच्या कारणात किती तथ्य आहे, हे पालिकेचे क्षयरोग विभाग अधिकारी तपासून पाहणार आहेत.
महानगरपालिकेकडून माहिती अधिकारामार्फत मृत्यू प्रमाणपत्र मिळवून त्यातील मृत्यूच्या कारणावरून ‘प्रजा फाऊंडेशन’ क्षयरोगाचे मृत्यू ठरवते. ‘प्रजा’नुसार २०१३ मध्ये क्षयरोगामुळे मुंबईत ७१२७ मृत्यू झाले आहेत तर गेल्या चार वर्षांत क्षयरोगाने तब्बल ३०,७२२ जणांचा बळी घेतला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार मात्र एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या काळात फक्त १,३९३ लोक क्षयरोगामुळे मृत्यू पावले आहेत तर चार वर्षांत ही आकडेवारी ५,२१३ वर पोहोचली आहे. मृत्यूसंख्येबाबतची ही तफावत वादग्रस्त ठरली. त्याबाबत प्रसारमाध्यमे तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार विचारणा झाल्यानंतर पालिकेकडून ठोस पुराव्यांसह उत्तरे दिली जात नव्हती. ‘पालिका त्यांच्या रुग्णालयातील आकडेवारी देते तर प्रजा फक्त प्रमाणवत्रांवर नोंद झालेले कारण पुढे करत आकडेवारी देते. क्षयरुग्णांची मृत्यूसंख्या ही या दोहोंच्या दरम्यान आहे. ती शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले आहेत,’ अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा भावना गवळी यांनी दिली. प्रजा फाऊंडेशन केवळ मृत्यू प्रमाणपत्रांवरील नोंद पाहते. मात्र ही नोंद किती खरी आहे त्याचा मागोवा घेतला जात नाही. बेगर्स होम किंवा झोपडपट्टय़ांमधील मृत्यूंना सरसकट क्षयरोगाचे कारण चिकटवले जाते. काही वेळा रुग्णाला सहा-सात वर्षांपूर्वी क्षयरोग झालेला असतो. मात्र तरीही मृत्यू प्रमाणपत्रात ते कारण लावले जाते. मृत्यू प्रमाणपत्रावरील कारणांचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या सर्व २४ विभागांतील क्षयरोग जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मृत्यू प्रमाणपत्रावरील क्षयरोगाच्या उल्लेखाचे नेमके कारण शोधण्याची मोहीम दिली आहे. सरकारी किंवा पालिका रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांबाबत छाननी करण्याची गरज नाही. मात्र खाजगी डॉक्टर तसेच रुग्णालयातून दिल्या गेलेल्या प्रमाणपत्राबाबत संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली जाईल. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या दरम्यान खाजगी डॉक्टरांनी नोंद केलेल्या २० टक्के प्रमाणापत्रांची छाननी झाली तरी चित्र स्पष्ट होईल, असे क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. मिनी खेतरपाल म्हणाल्या.

शोध मोहीम
पालिकेच्या प्रत्येक विभागातील क्षयरोग जिल्हा अधिकारी सहभागी
चार पानांचा, ४० प्रश्नांचा अर्ज
खाजगी डॉक्टरांकडे जाऊन चौकशी करणार
प्रसंगी रुग्णाच्या घरी जाऊन मागोवा घेणार
खाजगी डॉक्टरांकडून दिल्या गेलेल्या किमान २० टक्के प्रमाणपत्रांचा अभ्यास
यातून क्षयरोग मृत्यूंचे चित्र स्पष्ट होईल, असा पालिकेचा दावा.