पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात कामगार संघटनांनी बाह्य़ा सरसावल्या आहेत. येत्या शुक्रवारपासून कर्मचारी साफसफाई करणार नाहीत, अन्यथा औद्योगिक न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने पालिका आयुक्तांना दिला आहे. तर हातमोजे, मास्कअभावी सफाई मोहीम सुरू करून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाचा धिक् कार करीत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेने याबाबतच्या परिपत्रकालाच आक्षेप घेतला आहे.

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पालिका कार्यालयांची साफसफाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून दर शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दोन तास थांबून कार्यालय आणि परिसरात साफसफाई करण्याचे आदेश पालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाने परिपत्रक जारी करून अलीकडेच दिले आहेत. या संदर्भात पालिकेतील कामगार संघटना मूग गिळून बसल्याचे वृत्त शुक्रवारी ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध होताच कामगार संघटनांच्या नेत्यांची धावपळ उडाली.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा रोष ओढवू नये यासाठी कामगार संघटनांनी आता प्रशासनाच्या या परिपत्रकाला कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेत्यांनी पालिकेच्या जी-उत्तर विभागात धाव घेत प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.
प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे थांबवावे अन्यथा औद्योगिक न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस महाबळ शेट्टी यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्राद्वारे दिला आहे. त्याचबरोबर काही नगरसेवकांनी स्वच्छता स्पर्धेच्या नावाखाली सफाई कामगारांची सुरू असलेली पिळवणूक थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मनसेप्रणीत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेनेही या आंदोलनात उडी घेतली आहे. पालिका कार्यालयांमध्येच नव्हे तर संपूर्ण मुंबईमध्ये साफसफाई करण्याची आवश्यकता आहे.
साफसफाई करताना संबंधितांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजीही घेणे गरजेचे आहे. सध्या महापालिका कर्मचाऱ्यांना दर शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दोन तास कार्यालयाची साफसफाई करण्याची सक्ती करण्यात आली आहे. पण त्यांना हातमोजे अथवा मास्कचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सफाईच्या वेळेतही बदल करणे आवश्यक असून या मोहिमेतून साहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुखांवरील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी केली आहे.