मृत व्यक्तीचे शरीर एकीकडे, तर पाय दुसरीकडे सापडले. आता त्याचे तोंड कोठे आहे, त्याचा शोध घेण्याचे आव्हान हिंगोली पोलिसांसमोर आहे. कळमनुरी तालुक्यातील गोर्लेगाव शिवारात हा प्रकार उघडकीस आला. या शिवारातील विहिरीमध्ये पोत्यात बांधलेले मयताचे शरीर पोलिसांना गेल्या १७ डिसेंबरला, तर या व्यक्तीचे पाय २७ डिसेंबरला वाशीम येथे आढळून आले. आता त्याच्या मुंडक्याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गोर्लेगाव शिवारातील विहिरीत पोत्यात बांधलेला मुंडके व पाय गायब असलेला मृतदेह सापडला. हा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तो प्रकाश झुंगरे याचा असल्याचे त्याच्या कपडय़ांवरून नातेवाइकांनी ओळखले. बाळापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद होते न होते तोच दुसऱ्याच दिवशी त्याची पत्नी सुशीलाबाई हिचा मृतदेह कुपटी शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला सापडला. या प्रकारामुळे जिल्ह्य़ात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणाच्या तपासासाठी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपअधीक्षक माणिक पेरके यांनी आंदोलकांची भेट घेऊन खून प्रकरणाचा तपास आठ दिवसांत लावण्याची ग्वाही दिली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी खून प्रकरणाचा तपास बाळापूर पोलिसांकडून काढून घेण्याची मागणी केली. ती दाभाडे यांनी मान्य करून तपासाचे काम स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक एम. ए. रऊफ यांच्याकडे सोपविले. मृतदेहाचे पाय वाशीम येथे एका खदानीत पिशवीत टाकल्याचे गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सापडले. कपडय़ावरून ते पाय प्रकाश झुंगरेचेच असल्याचे आढळून आले. आता शिर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.