एक यशस्वी मॉडेल हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून यशस्वी होऊ शकतेच असे नाही. पण, मॉडेलिंग-जाहिरात क्षेत्रातून हिंदी चित्रपटांकडे वळणाऱ्या अभिनेत्रींची संख्या अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळेच जाहिरात-मॉडेलिंग या पायऱ्या आहेत, इथून पुढे चित्रपटात शिरायचे अशा ठोकताळ्यांवर काम करणं सोडून दिलं पाहिजे, असं विशाखा सिंगचं ठाम मत आहे. मॉडेलिंगपासून सुरुवात करणाऱ्या विशाखाने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘खेलेंगे जी जान से’ या चित्रपटातून पहिल्यांदा काम केले. मात्र, गोवारीकरांचा पहिला चित्रपट करूनही तिला बॉलीवूडमध्ये खरा ब्रेक मिळवण्यासाठी वाट पाहावी लागली. सध्या एक्सेल एंटरटेन्मेंटचा ‘फुकरे’ आणि विक्रम भट्टच्या ‘अंकुर अरोरा मर्डर केस’ या दोन्ही चित्रपटांत विशाखाने नायिकेचे काम केले. आता लागोपाठ तिचा ‘बजाते रहो’ हा तिसरा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण, केवळ अभिनयापुरती मर्यादित न राहता अनुराग कश्यपच्या एका चित्रपटासाठी प्रेझेंटर म्हणूनही ती काम पाहते आहे.
अनुरागच्या चित्रपटासाठी प्रेझेंटर म्हणून ‘कान’च्या रेड कार्पेटवर टेचात वावरणाऱ्या विशाखाची छबी माध्यमांनी टिपली. आणि अरे! ही कानला पोहोचली कशी?, हा प्रश्न बॉलीवूडच्या तमाम मंडळींना पडला. त्यावर विशाखा हसून उत्तर देते, ‘कानच्या रेड कार्पेटवर वावरणाऱ्यांना प्रसिद्धी मिळते हे मी ऐकलं होतं. खरं म्हणजे अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या चित्रपटाशी मी एक प्रेझेंटर म्हणून जोडले गेले आहे आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी म्हणून मी कानला होते. मी फक्त चित्रपट पाहण्यासाठी आत शिरताना त्या रेड कार्पेटवरून चालत गेले आणि तरीही मला जी प्रसिद्धी मिळाली ती अभूतपूर्व होती. मला राहून राहून या प्रकारची गंमत वाटते. यातला गमतीचा भाग सोडला तर खरोखरच कानमध्ये आपल्या चित्रपटांसाठी जी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे तिला तोड नाही,’ असे विशाखा सांगते. कान महोत्सवात चित्रपटांचा एक बाजार असतो. इथे आपले चित्रपट विकत घेण्यासाठी परदेशी निर्माते-दिग्दर्शक आवर्जून आपल्या स्टॉल्सना भेट देतात आणि या बाजारपेठेचा मोठा फायदा आपल्याकडच्या छोटय़ा बजेटमध्ये बनलेल्या, वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांना होतो आहे, अशी माहितीही तिने दिली. शेखर कपूर, अनुराग कश्यपसारख्या सर्जनशील दिग्दर्शकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याकडील नव्या प्रवाहातील सिनेमांची ओळख करून दिली. कुठेही फिल्मीपणा नसलेले आणि वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या या छोटय़ा चित्रपटांना विविध महोत्सवातून मोठी मागणी आहे आणि म्हणूनच आपल्याकडचे असे चित्रपट पहिल्यांदा महोत्सवातून दाखवले जातात. तरच त्यांना आपल्याकडे व्यावसायिकदृष्टय़ा चित्रपट प्रदर्शित करणे फायद्याचे ठरते, असे विशाखाचे म्हणणे आहे.
बॉलीवूड सध्या आपल्या दंतकथांमधून बाहेर पडते आहे, असे सांगताना विशाखा ते अनेक उदाहरणांनी पटवून देते. तसे नसते तर माझ्यासारखी नवोदित अभिनेत्री एवढय़ा कमी वेळात आशुतोष गोवारीकर, फरहान अख्तर, विक्रम भट्ट अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम करू शकली नसती. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर बॉलीवूडमध्ये तुमचे आजच्या घडीला तरी बाहू पसरून स्वागत होते आहे. अर्थात, तुम्हाला जी भूमिका मिळते त्यात तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागते. मग तुम्ही नवीन असा किंवा जुने. अगदी राणी मुखर्जीसारखी तद्दन व्यावसायिक चित्रपटातून नंबर वन राहिलेली अभिनेत्री अनुरागची निर्मिती असलेल्या ‘अय्या’सारख्या चित्रपटातून काम करते जिने आजवर यशराज बॅनर सोडून जास्त काम केलेले नाही. फरहान आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेन्मेंटने आत्तापर्यंत फक्त मोठय़ा कलाकारांना घेऊन चित्रपट केले होते. ‘फुकरे’ या त्यांच्या चित्रपटात आम्ही सगळे कलाकार नवीन होतो. विक्रम भट्टसारखा दिग्दर्शक आपला भयपटांचा जॉनर सोडून ‘अंकुर अरोरा मर्डर केस’सारखा गंभीर आणि सत्यघटनेवरचा चित्रपट करतो. सध्या बॉलीवूड प्रयोगशील झाले आहे. इथे प्रत्येकजण वेगवेगळे प्रयोग करून स्वत:ला आजमावू पाहतो आहे आणि याच वेळी इथे असण्याचा फायदा आम्हा नवीन कलाकारांना होतो आहे, असा विश्वास विशाखाने व्यक्त केला.