भारतीय चित्रपटाला शंभर वर्षांचा इतिहास असून गेल्या काही वर्षांत हिंदी, मराठी आणि इतरही भारतीय चित्रपट तांत्रिकदृष्टय़ा सक्षम झाल्यामुळे ‘हॉलिवुड’च्या तुलनेत ‘बॉलिवुड’ चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतचा वेगळा ठसा उमटवत असल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते जितेंद्र कपूर यांनी व्यक्त केले.
भारतीय चित्रपट सृष्टीच्या शतक महोत्सवी वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रपट अभिनेते जितेंद्र, संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेत्री प्रार्थना बेहरे, चित्रपट कला दिग्दर्शक नितीन देसाई, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आमदार दीनानाथ पडोळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त श्याम वर्धने यावेळी उपस्थित होते.
१९३०च्या दशकातील चित्रपट हे तांत्रिकदृष्टय़ा सक्षम नसले तरी त्यावेळी चित्रपटाचे कथानक आणि कलावंतांनी चित्रपटाला वैभव प्राप्त करून दिले. कालांतराने भारतीय चित्रपटात अनेक तांत्रिक बदल करण्यात आल्यानंतर चित्रपटाचा दर्जा वाढला. ऑस्करसाठी भारतीय चित्रपटांची निवड व्हायला लागली. मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात चांगले कलावंत, दिग्दर्शक आणि पटकथाकार समोर आले आहे त्यामुळे मराठी चित्रपटाचा दर्जा वाढला आहे. एकता कपूरने दोन मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून दोन चित्रपटाचे काम सुरू आहे.
हॉलिवुडच्या तुलनेत बॉलिवुड चित्रपट तांत्रिकदृष्टय़ा प्रगती करीत आहे. चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात आलो त्यावेळी एका खोलीतून प्रवास सुरू केला. त्यावेळी चित्रपट काय असतो हे कळत सुद्धा नव्हते. मात्र कालांतराने चित्रपटात काम करण्याची संधी मिळत गेली. आज तांत्रिकदृष्टय़ा चित्रपट बदलत असला भारतीय चित्रपटाचा जे मूळ आहे ते आजही कायम आहे. चित्रपट सृष्टीचे जे वैभव बघायला मिळत आहे ते केवळ चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्यामुळेच. चित्रपट क्षेत्रात स्पर्धा असली तरी अनेक चांगले कलावंत आणि दिग्दर्शक समोर येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय चित्रपटाला चांगले दिवस येतील असा विश्वास जितेंद्र यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे म्हणाले, या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक  जुनेमराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांना बघायला मिळणार आहे.
भारतीय चित्रपटाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त चित्रपट महामंडळ वर्षभर विविध उपक्रम राबवणार आहे. नवोदित कलावंतांसाठी लघुपट आणि माहितीपट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यासाठी १ लाख आणि ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे देवतळे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अवधूत गुप्ते, नितीन देसाई, अनिल देशमुख यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ वितरक मनमोहन अरोरा यांचा सत्कार करण्यात आला.
चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ वितरक मनमोहन अरोरा यांचा सत्कार करण्यात येणार होता. कार्यक्रम सकाळी ११ वाजता असल्यामुळे एलकुंचवार नियोजित वेळेच्या आधी पंचशील चित्रपटगृहात उपस्थित होते, मात्र पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह इतर राजकीय नेते आणि प्रमुख अतिथी पोहचले नव्हते. शिवाजीराव मोघे ११.३०च्या सुमारास आले. प्रमुख अतिथी जितेंद्र, अवधूत गुप्ते पोहचले नव्हते. कार्यक्रमाला उशीर होत आहे हे एलकुंचवार यांच्या लक्षात येताच ते सत्कार न स्वीकारताच चित्रपटगृहातून परत गेले.