मुंबईत दोन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार आहेत, असा निनावी दूरध्वनी करणाऱ्या एकास पोलिसांनी शनिवारी भाईंदर येथून अटक केली. महेश लब्धे (४०) असे त्याचे नाव आहे. त्याने आपल्याला त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांना धडा शिकविण्यासाठी हा बनाव रचला होता.
शुक्रवारी सकाळी ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षास भ्रमणध्वनीवरून एक फोन आला. अंधेरी लोखंडवाला येथे राहणारे चार तरुण येत्या १५ ऑगस्टपूर्वी लोखंडवाला आणि सेंच्युरी बाजार येथे बॉम्बस्फोट करणार आहेत, अशी माहिती या इसमाने दिली.
गुन्हे शाखा ९ च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी या भ्रमणध्वनी क्रमांकाचा माग काढून भाईंदरमधून लब्धे याला अटक केली. तो उत्तन येथे बिगारी काम करतो. तेथील काही गुंड प्रवृत्तीची मुले त्याला मारहाण करून त्याला त्रास देत होती.
त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याने चार तरुण बॉम्बस्फोट करणार असल्याचा दूरध्वनी केला होता. पोलीस चौकशीसाठी आल्यावर या मुलांची नावे सांगून त्यांना अटक करवून देता येईल अशी त्याची योजना होती अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी दिली.