मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मनसेच्यावतीने जिल्हास्तरावर आयडीयल व साहित्य यात्रा यांच्या सहकार्याने प्रथमच ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यास युवा वर्गाचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.

मराठी दिनानिमित्त मनसेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात मनसेने वाचन संस्कृती वाढावी यावर लक्ष केंद्रीत करत कार्यक्रमांची आखणी केली आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थायी समितीचे राहुल ढिकले, मनसे गटनेते अशोक सातभाई, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे उपस्थित होते. ग्रंथोत्सवात मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमातील साहित्य संपदा साहित्य प्रेमीसाठी खुली आहे. त्यात व्यक्तीचरित्र, पाक, ज्योतीश, भविष्य, चित्रकला, उद्योग विश्व, बालक पालक, मुलांचे संगोपन, बाल वाड्मय, विज्ञान, वास्तुशास्त्र, धार्मिक, खेळ, कथा, कादंबरी, समीक्षा, संगीत, आरोग्य यासह विविध विषयावरील पुस्तके एक लाखाहून अधिक पुस्तके आहेत. प्रदर्शनाचे वेगळेपण म्हणजे युवा वर्ग जो वाचन संस्कृतीपासून दुर जात आहे, मोबाईल, व्हॉटस अ‍ॅप, हाईक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतोय, मात्र अक्षर संस्कृतीपासून दुरावत आहे. त्या वर्गाला आकर्षित करताना त्यांना एमपीएससी, युपीएससीसह अन्य स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील अशी विविध प्रकाशनांची पुस्तके एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विविध मासिके, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक पुस्तके यासह अन्य साहित्य वाचनासाठी खुले असल्याने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून युवा वर्गाचा प्रदर्शनास प्रतिसाद लाभत आहे. पाककलेच्या पुस्तकांनाही महिलांकडून मागणी असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी, राजगड कार्यालय येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन, ग्रंथ िंदंडीसह नियोजन सुरू आहे. समारोपास पक्षाध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.