पुस्तकांचा महोत्सव खऱ्या अर्थाने प्रगत समाजाचे लक्षण आहे. राज्यात ग्रंथोत्सवास मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ग्रंथोत्सवाची संस्कृती रुजत असल्याचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने बी. रघुनाथ सभागृहात आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या हस्ते झाले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरंगाबाद विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी उपस्थित होते. प्रा. भालेराव यांनी वाचनाचे महत्त्व विशद करताना ग्रंथोत्सवाची आवश्यकता प्रतिपादन केली. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांपासून ग्रंथोत्सव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. ग्रंथोत्सवातून विचारांची देवाणघेवाण होत असल्याने अशा उत्सवाचे महत्त्व अबाधित असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी ‘ग्रंथ माझे गुरू, ग्रंथ मायबाप’ ही कविता सादर केली. अधीक्षक पाटील यांनी मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात तरुणांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मुळी यांनी ग्रंथोत्सव आयोजनाचा उद्देश सांगितला. ग्रंथोत्सवामुळे वाचक आणि पुस्तके यांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध होत आहे, असे ते म्हणाले. जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी स्वागत केले. सायंकाळी निमंत्रित कवींची काव्यसंध्या झाली. यात रेणू पाचपोर, केशव खटिंग, सुरेश हिवाळे, संजय मुलगीर, संतोष नारायणकर आदींनी कविता सादर केल्या.