आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा संसार सांभाळणे हे मोठी अवघड गोष्ट आहे. या चळवळीसंबंधी अनभिज्ञ जॅकलिन डोळस यांनी आंबेडकर चळवळ समजून घेऊन घर, नोकरीसह कार्यकर्ते सांभाळले, त्यांना उमेद देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या या मूककार्याला अभिवादन, अशा शब्दांत प्रा. प्रकाश सिरसाठ यांनी भावना व्यक्त केल्या.
रमाई प्रकाशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या, आशय, व्हिजन व आदिती यांनी संपादित केलेल्या ‘जॅकलिन’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. मनोहर जिलठे, अॅड. अंकुश भालेकर, प्राचार्य ल. बा. रायमाने यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. संजय मून प्रास्ताविकात म्हणाले की, प्रा. अविनाश डोळस यांचे घर आंबेडकर चळवळीचे, परिसंवादाचे, बैठकांचे स्थळ आहे. या घराला हे स्वरूप येऊ देण्यास व त्याला या पद्धतीने विकसित करण्यात जॅकलिन यांचा मोठा सहभाग आहे. जातीव्यवस्थेला छेद देण्याच्या विचारातून त्यांनी केलेला आंतरधर्मीय विवाह हा त्याचे द्योतक आहे.
प्राचार्य रायमाने यांनी सांगितले की, फुले-आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या विश्वकुटुंबाचा प्रयोग म्हणजे जॅकलिन व अविनाश डोळस यांचे घर होय. सुमंगला खरे, डॉ. जिलठे यांचीही भाषणे झाली. प्रा. रेखा मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले.