डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी लिखित ‘वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र-एका वादाची सद्यस्थिती’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १९ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अरुण साधू यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास अ‍ॅड. गोविंद पानसरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पुस्तकात विदर्भ राज्याच्या मागणीच्या गेल्या ११० वर्षांच्या आंदोलनाची कारणमीमांसा, स्वतंत्र विदर्भाला विरोध असण्याची महाराष्ट्रवादी असणाऱ्या वैदर्भीयांची कारणे आणि हा संपूर्ण वाद का व कसा बेगडी आहे, ते स्पष्ट करणारी बाजू डॉ. जोशी यांनी या पुस्तकात मांडली आहे. हा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
वसंत संगीत
संगीतकार वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या नाटय़गीतांचा ‘वसंत संगीत’ हा कार्यक्रम येत्या ८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, दादर (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. शुभश्री निर्मित नाटय़गीतरंग या शीर्षकाअंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानचे पदविका प्राप्त विद्यार्थी ही गाणी सादर करणार आहेत. शुभदा दादरकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य आहे.
‘डूडल-२०१३’चे कुकडे यांच्या हस्ते उद्घाटन
मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड आर्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डूडल २०१३’ या जाहिरात प्रदर्शनाचे आणि कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच अ‍ॅड गुरु गोपी कुकडे यांच्या हस्ते झाले. पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या या कार्यक्रमास जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ब्रॅण्ड डिझाईन, पत्रकारिता, जाहिरात आणि चित्रपट निर्मिती, सुलेखन आणि अन्य विषयांवर विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा होणार आहेत.  
रांगोळी शिबीर
संस्कार भारती संस्थेतर्फे येत्या ७ एप्रिल रोजी कांदिवली (पश्चिम) येथे एक दिवसाचे रांगोळी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात आकर्षक पण सोप्यात सोप्या रांगोळ्या कशा रेखाटाव्यात याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी दीपक कांबळे(०२२-२८६९१५५०) किंवा संजय थवी (९७६९३९८७८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्कार भारतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.