अंकुश शिंगाडे लिखित ‘माझे शिकविण्याचे प्रयोग’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून महापौर अनिल सोले, आमदार नागो गाणार, डॉ. उल्हास फडके, डॉ. सुभाष गोतमारे, भास्कर काकडे, गणेश झाडे आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम शिक्षक परिषद करत असते, असे प्रतिपादन आमदार नागो गाणार यांनी यावेळी केले. महापौरांनीही याप्रसंगी विचार व्यक्त केले. शिंगाडे यांचे हे नववे पुस्तक असून यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्याची गाणी, अश्रूंची गाणी, आझादी के गीत हे कवितासंग्रह, वेदना, कंस या कादंबऱ्या, मजेदार कथा, चित्तथरारक कथा हे दोन कथासंग्रह तर ओळख शास्त्रज्ञांची हा लेखमाला संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंकातून ते झपाटय़ाने लेखनही करत आहेत. ‘माझे शिकविण्याचे प्रयोग’ या  पुस्तकात त्यांनी कमकुवत विद्यार्थ्यांना पुढे कसे आणता येईल, यासाठी केलेले प्रयोग, त्यांचे वर्जन दिलेले आहे.