जेव्हा मी माझ्य़ा दहा वर्षांच्या मुलीला विचारले, ‘तुला कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्हायचे आहे? ‘तिने अवघ्या काही सेकंदात उत्तर दिले, ‘मला कायम आनंदी राहण्यासाठी तज्ज्ञ व्हायचे आहे.’ माझ्य़ा आणखी एका बारा वर्षांच्या मुलीने मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘जर तुम्ही तुमचे आयुष्य जगत आहात, तर मग तुम्ही इतरांच्या अटी आणि शर्तीवर ते का जगत आहात?’ समुपदेशनाच्या क्षेत्रात वावरत असताना आयुष्यात अशा कितीतरी क्षणांचा सामना करावा लागला. अशा अभ्यासपूर्ण अनुभवांचे वास्तव डॉ. सपना शर्मा यांनी ‘स्पिरिच्युअल पॅरेंटींग – लेसन फ्रॉम अवर चिल्ड्रेन’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या पुस्तकात मांडले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, २१ सप्टेंबरला होत आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे कितीतरी अनुभव येत असतात, पण प्रत्येकवेळी आपण त्याकडे गांभीर्याने पाहतोच असे नाही. वास्तविक अशा छोटय़ाछोटय़ा क्षणांमधून बरेच काही शिकण्यासारखे आणि अनुकरणीय असते. मात्र, आपण मोठे असल्याच्या अविर्भावात वावरत असल्यामुळे लहान मुलांकडून काही शिकणे हे पालकांच्या पचनी पडत नाही. नेमके हेच अनुभवावर आधारित वास्तव या पुस्तकात मांडण्यात आले आहे. यात डॉ. शर्मा यांनी पालकांना एक प्रश्न विचारला आहे, ‘आपल्या मुलांसाठी एक उत्तम पालक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचा मार्ग तुम्हाला हवा आहे का?’ आयुष्याच्या या संपूर्ण प्रवासात तुम्हाला याचे उत्तर तुमच्या मुलांकडूनच मिळेल. ते स्वीकारायला शिका. तारुण्याच्या उंबरठय़ावर असणाऱ्या मुलांना कित्येकदा पालकांकडून उपदेशांचा भडिमार केला जातो. या अवस्थेतील मुले ते स्वीकारायला तयार असतीलच असे नाही.
पालक म्हणून तुमचे जसे विचार आहेत, तसेच विचार त्या मुलांचेही आहेत. कित्येकदा या मुलांच्या गोष्टींमधून खूप काही शिकण्यासारखे असते. अगदी सहजपणे आयुष्य जगताना ही मुले खूप काही पालकांना शिकवून जातात, पण पुन्हा तेच असते. तारुण्याच्या उंबरठय़ावरील मुलांकडून आपण काही समजून घेण्याच्या, शिकण्याच्या तयारीतच नसतो. कित्येकदा मुलांना अतिसंरक्षण देण्याच्या प्रयत्नात आपण असतो. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायला शिका. त्यांना त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या, त्यांचे अनुभव मोकळेपणाने तुमच्यासमोर मांडता आले पाहिजेत. तरच पालक आणि मुलांमधील अलीकडच्या काळात वाढत चाललेला दुरावा संपुष्टात येईल.
डॉ. सपना शर्मा गेल्या दीड दशकापासून समुपदेशनाच्या क्षेत्रात आहेत. विशेषत: लहानांपासून तर तरुण मुलांपर्यंतच्या वयोगटातील अनेक मुलांना त्यांचे पालक समुपदेशनासाठी त्यांच्याकडे घेऊन येतात. या दरम्यान कित्येक अनुभव हे हादरवून सोडणारे तर कित्येक विचार करायला लावणारे असतात. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांंपासून या अनुभवांच्या माध्यमातून पालक आणि मुलांमधील हे अंतर दूर करण्यासाठी काय करता येईल हा विचार मनात घोळत होता. त्यातूनच अनुभवांवर आधारित या पुस्तकाची कल्पना सुचल्याचे डॉ. सपना शर्मा यांनी सांगितले.
हे पुस्तक म्हणजे पालकांसाठी असलेल्या इतर पुस्तकांप्रमाणे नाही. यात पालकांनी काय करायला हवे आणि काय करायला नको, असेही नाही किंवा या पुस्तकात आध्यात्मिक सूचनासुद्धा नाहीत. हे पुस्तक म्हणजे आत्म्याचा प्रकाशाच्या दिशेने होणारा प्रवास आहे. एका पालकाचा अनुभवी व्यक्तीपासून तर आत्मकेंद्रीय व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास आहे. डॉ. सपना शर्मा यांनी प्रथमच या पुस्तकाच्या माध्यमातून आनंदी आणि आध्यात्मिक आयुष्य जगण्याचा मंत्र दिला आहे. मन:शांतीचा एक प्रवास या पुस्तकातून मांडण्यात आलेला आहे.