18 October 2019

News Flash

पुस्तकांच्या पायरसीची उलाढाल ४० कोटींची!

एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की, त्यांच्या सीडीची पायरसी होण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत आता साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील पुस्तकांचीही पायरसी होत

| August 9, 2014 04:16 am

एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की, त्यांच्या सीडीची पायरसी होण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत आता साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील पुस्तकांचीही पायरसी होत असल्याचे दिसून येत आहे. उपराजधानीत नुकताच पुस्तक पायरसीचा प्रकार उघडकीस आला असून शैक्षणिक आणि साहित्यिक, अशी हजारो पुस्तके गुन्हे शाखेच्या विभागाने कारवाई करून जप्त केली आहेत. नागपुरात पुस्तक पायरसीचा हा व्यापार जवळपास ४० कोटींचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्यामुळे अन्य राज्यात याचे मोठे जाळे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चित्रपटांच्या सीडीज पायरसी करून त्या विकण्याचे प्रकार अनेक वर्षांंपासून सुरू आहेत. मात्र, त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे कोटय़वधीचा हा व्यवसाय खुलेआम चालत आहे. सीडींप्रमाणे पुस्तक पायरसीचाही मोठा व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाल्यानंतर सीताबर्डीवरील टी पॉईंटजवळच्या जुन्या पुस्तकांच्या बाजारात छापा मारून हजारो शैक्षणिक आणि इतिहासाची पायरसी केलेली पुस्तके जप्त केली आहेत. या पुस्तक पायरसीचा लेखक, वाचक, प्रकाशक या तिघांनाही फटका बसत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात पुस्तक पायरसीचे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. त्याचा फायदा घेत काही असामाजिक तत्व घेत असून शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील पुस्तकांची पायरसी करून ती बाजारात विकत आहेत. राज्य सरकारने या विषयाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे आणि कोणाचाही त्यावर वचक नसल्यामुळे हा व्यवसाय बिनधास्त सुरू आहे. जुन्या पुस्तक बाजारात छापा टाकल्यानंतर त्यात शैक्षणिक, स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके सापडली. या पुस्तकांच्या किमती मूळ किमतीपेक्षा कमी असल्यामुळे वाचक ती विकत घेतात. केवळ अभ्यासक्रमातीलच नव्हे, तर साहित्यकांच्या पुस्तकांच्याही पायरसी होत असल्याचे दिसून आले. ज्या पुस्तक विक्रेत्यांकडे ही पायरसी पुस्तके आढळली त्यांच्यावर कारवाई सुरू असली तरी यामागे कोण आहे, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.
सरकार काय करते? -मकरंद कुळकर्णी
या संदर्भात साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुळकर्णी म्हणाले, हा प्रकार अनेक वर्षांंपासून सुरू असला तरी यावर कोणीच बोलायला तयार नाही. त्याचा परिणाम प्रकाशकांवर होत आहे. लेखकाने पुस्तक लिहिल्यानंतर प्रकाशक ते परिश्रम करून बाजारात आणतो. मात्र, त्याची पायरसी होत असेल तर प्रकाशक काय करणार? विदर्भातील प्रकाशकांनी यापूर्वीही हा प्रकार उघडकीस आणला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. केवळ शैक्षणिकच नाही, तर साहित्यिकांच्या पुस्तकाचीही पायरसी होत असल्यामुळे त्याचा फटका प्रकाशक आणि विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे हा प्रकार थांबविण्यासाठी सरकारने नेमके धोरण निश्चित केले पाहिजे. शैक्षणिक पुस्तकांची पायरसी मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे त्यावर बंदीच आणली गेली पाहिजे. हे करणाऱ्यांना खर्च फारसा येत नसल्याने पुस्तकाची विक्री करताना ते मूळ किमतीपेक्षा अध्र्या किमतीत विकतात आणि वाचक ते घेतात. यात वाचकही तेवढेच दोषी आहेत. पायरसी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी कुळकर्णी यांनी केली. लाखे प्रकाशनचे चंद्रकात लाखे म्हणाले, या प्रकारामुळे लेखन कमी होईल. सरकारने यासंदर्भात वर पाबंदी आणली गेली पाहिजे. शैक्षणिक पुस्तकांची पायरसी होत असेल तर राज्य सरकारने त्यासंदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी लाखे यांनी केली.

First Published on August 9, 2014 4:16 am

Web Title: books piracy turnover of rs 40 crore
टॅग Copyright