वेतनवाढीचा करारनामा रखडल्यावरून आंदोलन करणाऱ्या बॉश कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सातपूर येथे कोणतीही परवानगी न घेता रास्ता रोको केल्याप्रकरणी पदाधिकाऱ्यांसह कामगारांवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कारखान्यात व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीच्या करारावरून दीड वर्षांपासून वाद सुरू आहे. नव्या करारात व्यवस्थापनाने उत्पादनात आठ टक्के वाढ मागितली आहे. संघटना उत्पादन वाढीस राजी असली तरी त्यानुसार वेतनवाढदेखील दिली जावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच प्रशिक्षणार्थी म्हणून दहा वर्षांपासून काम करणाऱ्या एक हजार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या प्रश्नावर कामगार उपायुक्तांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांनी सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. मंगळवार हा या आंदोलनाचा सहावा दिवस. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी पहिल्या सत्रातील कामगारांनी नियमित कामकाज करून कारखान्यातील भोजनावर बहिष्कार टाकला. सायंकाळी काम आटोपल्यावर शेकडो कामगार कामगार उपायुक्त कार्यालयावर पोहोचले. १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आपली वाहने कामगार आयुक्त कार्यालय ते सातपूर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात उभी करून रास्ता रोको केला. या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संघटनेचे पदाधिकारी हेमंत भामरे व पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उशिराने त्यांची जामिनावर मुक्तता केली.