केंद्र सरकारमधील संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या अन्नसुरक्षा कायदा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या श्रेयावरून जिल्हापातळीवरही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. या योजनेचा जिल्हय़ातील शुभारंभाचा कार्यक्रम उद्या, शनिवारी (दि. १) जामखेड येथे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमास काँग्रेसचे दोन्ही मंत्री उपस्थित राहणार नाहीत. त्याऐवजी जिल्हा काँग्रेसने या योजनेचा कार्यक्रम स्वतंत्रपणे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दि. ४ रोजी श्रीरामपूर येथे आयोजित केला आहे.
या रस्सीखेचीला पुन्हा काँग्रेसअंतर्गत थोरात-विखे गटातील वादाचीही झालर लाभलेली आहेच. श्रीरामपूरला दि. ४ रोजी होणाऱ्या योजनेच्या कार्यक्रमास कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
योजनेची माहिती जिल्हा प्रशासनाने कालच वृत्तपत्रांना दिली होती, मात्र हा काँग्रेसचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे सांगत पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद आयोजित करत योजनेची तीच माहिती दिली. या वेळी ससाणे व सारडा यांनी दिलेल्या माहितीतूनच योजनेच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांत कशी रस्सीखेच सुरू आहे, यावर प्रकाश पडला. ससाणे यांनीच पालकमंत्र्यांच्या जामखेड येथील कार्यक्रमाचे पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना निमंत्रण आहे की नाही किंवा ते उपस्थितीत राहणार की नाही, याची आपल्याला माहिती नसल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर मंत्री थोरात यांच्या हस्ते दि. ४ रोजी याच योजनेचा कार्यक्रम श्रीरामपूर येथे पक्षाच्या वतीने आयोजित केल्याची व विखे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांची तारीख घेतली जात असल्याची माहिती ससाणे यांनी दिली.
जिल्हय़ातील ३१ लाख ८४ हजार ५७५ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेमुळे जिल्हय़ात २७ लाख शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची नवात वाढ झाली. अंत्योदयच्या लाभार्थ्यांना दरमहा, प्रतिकार्ड ३५ किलो धान्य मिळेल, त्यात २० किलो गहू २ रु. किलोप्रमाणे व १५ किलो तांदूळ ३ रु. दराने मिळतील, एपीएल कार्डधारकांना (केशरी) दरमहा प्रतिकार्ड १० किलो गहू ७ रु. २० पैसे दराने व ५ किलो तांदूळ ९ रु. ६० पैसे दराने मिळेल, दारिद्रय़रेषेखालील लाभार्थीना प्रतिमाणसी, दरमहा ३ किलो गहू २ रु. दराने व व २ किलो तांदूळ २ रु. दराने मिळणार आहे. राज्यातही योजनेची सुरुवात उद्याच होत आहे.