माटुंगा येथील डेव्हिड ससून बालसुधारगृहात मारहाणीनंतर जखमी झालेल्या अहमद शेख या १७ वर्षीय मुलाचा गुरुवारी नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी त्याला मारहाण करणाऱ्या दोन मुलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पवईच्या मिलिंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अहमद जलील शेख (१७) याला अमलीपदार्थाच्या गुन्ह्य़ात १७ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी माटुंग्याच्या डेव्हिड ससून बालसुधारगृहात करण्यात आली होती. दरम्यान त्या रात्री अहमदने इतर मुलांबरोबर सुधारगृहातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता. १८ मे रोजी अमलीपदार्थ देण्याच्या वादातून त्याला सुधारगृहातील इतर मुलांनी बॅट आणि लाकडाने बेदम मारहाण केली. त्यात त्याला मुका मार लागला होता. त्या जखमेने तो व्हिवळत होता. २० मे रोजी त्याच्या वडिलांनी त्याची जामिनावर सुटका केली होती. घरी आल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याला सुरुवातीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर प्रकृती खालावल्याने नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. आम्ही याप्रकरणी संबंधित दोन मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे परिमंडळ ५चे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अन्य कुणाचा सहभाग आहे का, तसेच सुधारगृहातील प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवला का, त्याचाही पोलीस तपास करत आहेत.