कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद गावात चावडीनजीक एका विवाहित महिलेस तिच्या प्रियकराने दांडक्याने मारून जबर जखमी केले. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळून टाकले.
सुषमा दिलीप येवले (वय २८, रा. रणदुल्लाबाद, ता. कोरेगाव) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडित महिलेचे नाव आहे. त्याच गावातील विजय रामचंद्र शिंदे (वय ३४)असे या संशयिताचे नाव आहे. त्याला वाठार स्टेशन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    सुषमा सेवले यांचे यापूर्वी दोन विवाह झाले आहेत. पहिल्या पतीने त्यांना घटस्फोट दिला तर दुस-या पतीपासून त्या विभक्त राहात होत्या. रणदुल्लाबाद येथेच आईवडिलांच्या घराजवळ त्या भाडय़ाने घर घेऊन मुलगी सिद्धीसह (वय ४) राहात होत्या. दोन वर्षांपासून त्यांचे विजय िशदे याच्याबरोबर अनतिक संबंध होते. त्यातून त्या गर्भवती राहिल्या होत्या. दोघांनी संमतीने गर्भपात करून घेतला होता. तेव्हापासून त्यांनी विजयच्या मागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु विजयची तशी मानसिकता नव्हती म्हणून सुषमाने विजय विरुद्ध वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गावातील लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर तुला पत्नीप्रमाणे वागवीन असे आश्वासन विजयने सुषमाला दिले होते. त्यानुसार आज नोटरी करण्याचे ठरविले होते. त्यासाठी कोरेगावला जाण्यासाठी साडेअकराच्या सुमारास सुषमा मुलगी सिद्धीसह चावडी नजीकच्या पारावर उभी होती. बाराच्या दरम्यान विजय तिथे आल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात विजयने सुषमाला दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. डोक्यात जोरदार मार बसल्याने सुषमा रक्तबंबाळ झाली. या वेळी मुलगी सिद्धी आजोबांना सांगायला पळत गेली.

सुषमाचा आक्रोश ऐकून गावातील महिला पुढे आल्या असता विजय त्यांच्यावरच धावून गेला व दमदाटी केली तेव्हा बघ्यांनी त्या ठिकाणहून पळ काढला. जबरी मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील सुषमा निपचित पडल्याचे पाहून विजयने खिशातून दोन पेट्रोलच्या बाटल्या काढल्या आणि पेट्रोल ओतून सुषमाला पेटवून दिले. गोंधळ व जोरदार आवाज ऐकून ग्रामपंचायतीतील लोक बाहेर आले तेव्हा त्यांनाही विजयने जवळ येण्यापासून अटकाव केला. विजय ऐकत नाही व त्याचे कृत्य पाहून एकाने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जळणा-या मृतदेहावर पाणी टाकले. पोलीस पोचले तरीही विजय तेथेच येरझा-या घालत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.