धर्मपीठ, धर्मसंस्कार व संस्कार देणारा मूळ पायाच अर्निबंध होत चालल्याने ब्राह्मणांच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला आहे. सदाचार, कुळाचार विसरत चालल्यामुळे ब्राह्मणत्व धोक्यात आले आहे. याचा फायदा घेत ब्राह्मण समाजाविषयी आज समाजात पराकोटीचा द्वेष पसरविला जात आहे. यासाठी ब्राह्मण समाजाने जागरूक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन समाजसेविका डॉ. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
‘सार्थक’ महाराष्ट्रीयन ब्राह्मण उद्योजक मंडळ नागपूरतर्फे मुंडले सभागृहात ‘कुटुंब व्यवस्था आणि व्यवसाय’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. रामतीर्थकर बोलत होत्या. यावेळी निखील मुंडले, दिलीप चित्रे, मंडळाचे अध्यक्ष आनंद घारे, उपाध्यक्ष उदय नाईक, मनोज पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निखील मुंडले व दिलीप चित्रे यांचा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सत्कार करण्यात आला.
देशाचा स्वातंत्र्य लढा असो वा सामाजिक ब्राह्मणांनी त्यात सहभाग घेतला आहे. परंतु आज त्याच ब्राह्मण वर्गाविषयी समाजात विष पेरल्या जात आहे. त्यांच्याकडून पौरोहित्यदेखील काढून घेण्याचा डाव आहे. शिक्षण व्यवस्था आज आपल्या हातून गेली आहे. शाळेतून सरस्वतीचे पूजन बंद झाले आहे.
ब्राह्मणवर्गातील मुली धर्मातरित करून विवाह करण्याचाही डाव साधल्या जात आहे. आपल्या संस्कृतीचा विसर व नवीन जीवनपद्धतीच्या नादात आजचे विवाह टिकत नाहीत. आर्थिक महामंडळ स्थापन करून ब्राह्मण युवकांना उद्योगासाठी अर्थसाहाय्य मिळायला हवे, अशी मागणी यावेळी डॉ. रामतीर्थकर यांनी केली. प्रास्ताविक मनोज पाठक यांनी केले तर संचालन नीता खोत यांनी केले. आभार देवयानी केळकर यांनी मानले.
महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवकांना उद्योजकतेकडे वळविण्याकरिता सार्थक महाराष्ट्रीयन ब्राह्मण उद्योजक मंडळाची स्थापना करण्यात आली असून संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम राबवून युवकांना प्रोत्साहित करण्याचे कार्य करण्यात येत आहे. संस्थेच्या कार्याशी जुळण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आनंद घारे यांनी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 10:45 am