नातेवाईकांनी ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीचे अवयव दान करून दोघांना नवजीवन प्राप्त करून दिले. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे दोन्ही मूत्रपिंड दोन व्यक्तींवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून बसवण्यात आल्याने त्यांना ‘नवजीवन’ प्राप्त झाले तर एका अंध व्यक्तीला डोळे दान केल्याने त्याच्या अंधकारमय जीवनात ‘प्रकाश’ पडला. गेल्या काही दिवसात नागपूर शहरात अवयव दान करून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जी. नागेश्वर राव (५४) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आठ दिवसांपूर्वी वानाडोंगरी येथे रस्ता अपघातात जबर जखमी झाल्याने त्यांना वानाडोंगरी येथील लता मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले. अपघातात त्यांच्या मेंदूला जखम झाल्याने ते कोमात गेले होते. लता मंगेशकर रुग्णालयातून त्यांना वोक्हार्टमध्ये आणण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्यांना ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांना जीवनप्रणालीवर ठेवण्यात आले. येथे उपचार सुरू असताना रुग्णालयातील मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. प्रमोद गिरी यांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित केले. यानंतर रुग्णालयातील चमूने मृताचे मूत्रपिंड व डोळे दान करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मृताचे दोन्ही मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यास होकार दिला.
त्यानुसार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला ही माहिती देण्यात आली. समितीनेही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास मंजुरी प्रदान केली. यासाठी समितीचे सदस्य डॉ. रवी वानखेडे यांनी मोलाचे प्रयत्न केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) न्यायवैद्यकशास्त्र विभाग आणि धंतोली पोलीस यांनीही कायदेशीर सहकार्य केले. यानंतर मृताचे दोन्ही मूत्रपिंड आणि दोन्ही डोळे काढण्यात आले. यानंतर ऑरेंज सिटी रुग्णालयात एका रुग्णावर तर वोक्हार्ट रुग्णालयात दुसऱ्या रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारे दोन रुग्णांना जीवनदान मिळाले, तर एकाच्या जीवनात पसरलेला अंधार डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे दूर झाला. या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ऑरेंज सिटी आणि वोक्हार्ट रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.
यानंतर ऑरेंज सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार, मूत्रपिंड शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. एस. आचार्य, डॉ. रवी वानखेडे आणि समुपदेशक मंजिरी दामले यांनी राव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी समाजाप्रती दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांचे कौतुक केले.