‘क्रिश-३’, ‘धूम-३’, ‘दबंग-२’, ‘रेस-२’ अशा सिक्वलपटांच्या येण्यामागचं मुख्य कारण त्यांच्या कर्त्यांकडून सांगितलं जातं ते म्हणजे हे चित्रपट आता स्वत:च एक ब्रँड म्हणून प्रस्थापित झाले आहेत. प्रस्थापित गोष्टीच्या जोरावर जेव्हा दुसरी गोष्ट सांगितली जाते तेव्हा चित्रपट यशस्वी होण्याची संधी जास्त असते. पण केवळ चित्रपट हा ब्रँड नसतो. त्यामागे त्या त्या चित्रपटाचे प्रस्थापित कलाकारही असतात. आमिर खान, शाहरूख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन या प्रत्येक नावाचा एक वेगळा ब्रँड आहे. पण कधी कधी कुठलेही प्रस्थापित कलाकार नसताना, कुठलीही ठरावीक यशाची समीकरणं न मांडताही भट्ट कॅ म्पच्या ‘विशेष फिल्म्स’सारख्या निर्मिती संस्था आजघडीला स्वतंत्रपणे एक ब्रँड म्हणून आपलं अस्तित्व टिकवून आहेत. यात ब्रँड म्हणून चित्रपट, कलाकार की त्यांना घडवणाऱ्या निर्मिती संस्था मोठय़ा.. या प्रश्नाचं उत्तर बॉलीवूडकडे नाही. तरीही ब्रँड बिल्डिंग हा बॉलीवूडसाठी परवलीचा शब्द झाला आहे. या वाढत्या ब्रँडगिरीकडे खुद्द बॉलीवूडची मंडळी कोणत्या दृष्टीने पाहतात? ब्रँड आणि यशाचं खरोखरच काही साटंलोटं आहे का.. याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘द स्क्रीन बिग पिक्चर’च्या चर्चासत्रातून करण्यात आला.
मोठे कलाकार आणि मोठे बॅनर किंवा निर्मिती संस्था एकत्र येतात तेव्हा चित्रपट हिट होणार असा एक पायंडा बॉलीवूडमध्ये कायम आहे. मात्र कोणताही मोठा कलाकार न घेता आम्ही घडवू तो कलाकार आणि आम्ही देऊ तो चित्रपट अशा थाटात यशस्वी चित्रपट देणाऱ्या महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची ‘विशेष फिल्म्स’ ही निर्मिती संस्था एक ब्रँड म्हणून स्वत:चं असं वेगळं अस्तित्व राखून आहे. त्यामुळे भट्ट कॅम्पला क धी तथाकथित ब्रँड कलाकारांची गरज भासली का, या प्रश्नावर मुकेश भट्ट यांनी आपली आठवण सांगितली. बॉलीवूडमध्ये यशाची गणितं नेहमीच बदलत असतात. त्यामुळे २७ वर्षांपूर्वी जेव्हा विशेष फिल्म्सची निर्मिती झाली तेव्हा आशय हाच राजा असेल हे सूत्र धरून आम्ही चित्रपटनिर्मिती करायची ठरवली होती. चित्रपटांच्या ठरावीक साचांपेक्षाही बदलत जाणाऱ्या प्रेक्षकांची विचारधारा लक्षात घेऊन त्याला काय हवं ते आपल्या चित्रपटातून द्यायचं ही आमच्या विचाराची चौकट होती. त्यामुळे दर दहा वर्षांनंतर विशेष फिल्म्सनेही जे निर्माण केलं ते पुसून मी आणि महेश आम्ही दोघंही नव्याच्या मागे लागत आलो आहोत, असं मुकेश भट्ट यांनी सांगितलं. विसाव्या शतकाला सुरुवात होत असताना एको सकाळी मी आणि महेश चर्चा करीत बसलो होतो, त्या क्षणाला एखाद्या मोठय़ा कलाकाराच्या मानधनाचा आकडा हा त्या चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा मोठा आहे, हे आमच्या लक्षात आलं. त्या वेळी आपण आपल्या चित्रपटातून पुढचे कलाकार घडवायचे हा निर्णय आम्ही घेतला होता. आज तो आमचा यशस्वी निर्णय होता, हे मी अभिमानाने सांगू शकतो. नवीन कलाकार, नवीन संगीतकार, नवीन कथालेखक असल्याशिवाय आम्ही चित्रपट केले नाहीत. आज आम्हाला नवीन गुणवत्ता शोधावी लागत नाही. आमच्याकडे जे काही नवीन येतंय ते वेचून, निवडून घेण्याचं काम आम्ही करीत आहोत, असं मुकेश भट्ट यांनी सांगितलं.
एकीकडे खाजगी निर्मिती संस्था आपल्या विचारांवर ठाम राहूनही यशस्वी चित्रपट करू शकतात, मग गेली कित्येक र्वष समांतर चित्रपटांसाठी अर्थपुरवठा करणारी ‘एनएफडीसी’सारखी सरकारी संस्था या बदलत्या प्रवाहात नेमकी कुठं आहे, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तरी एनएफडीसी ही कधीच चित्रपटनिर्मितीच्या केंद्रस्थानी असू शकत नाही, असं ठाम मत एनएफडीसीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीना लाथ गुप्ता यांनी मांडलं. हिंदी चित्रपटसृष्टी ही प्रारंभापासूनच खाजगी निर्मिती संस्थांवर अवलंबून होती. व्यावसायिक चित्रपटांमध्ये नवीन गुणवत्तेला संधी देण्यासाठी विशेष फिल्म्ससारख्या निर्मिती संस्था आहेत. त्यामुळे एनएफडीसीला तिथं वावच नाही. मुळात, जिथं खाजगी संस्था चित्रपटनिर्मितीचा उद्योग यशस्वीपणे सांभाळत आहेत तिथं सरकारी संस्थांनी मध्येच खोडा घालण्याचं काही कारणच नाही. उलट, अशा व्यावसायिक प्रयत्नांना पूरक साथ देणं ही देशाची जबाबदारी आहे. ती एनएफ डीसीच्या माध्यमातून उत्तमपणे पार पाडली जात आहे, असं नीना लाथ गुप्ता यांनी सांगितलं. एकीकडे निर्मिती संस्थाच कलाकार घडवतात, हे वास्तव आहे तर मग कलाकार कधीपासून ब्रँड व्हायला लागले? यावर कलाकारांचं व्यवस्थापन करणारी मंडळी आणि जाहिरातदार एकत्र आले. एखाद्या उत्पादनासाठी अमुक एक कलाकार हवा.. असा विचार जेव्हा मांडला गेला तेव्हा प्रत्येक उत्पादनांच्या जाहिरातीमागे कलाकारांची ‘फेस व्हॅल्यू’ ब्रँडमध्ये परावर्तित झाली, असं प्रतिपादन ‘पर्सेप्ट’च्या अजय चांदवानी यांनी केलं. मात्र, स्वत: जाहिरातींकडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलेल्या आर. बाल्की यांनी याची सुरुवात कशी झाली हे माहीत नाही, पण ते लवकरच थांबलं पाहिजे, अशा शब्दांत आपली असहमती दर्शविली. जाहिरातीतून एखाद्या कलाकाराचा चेहरा सतत दिसणार असेल तर त्याची लोकप्रियता वाढण्यापेक्षा ती घटते, असं आपलं स्पष्ट मत असल्याचं त्यांनी सांगितलं.
रजनीकांतसारखा अभिनेता कोणत्याही उत्पादनांची जाहिरात करीत नाही, तरी तो स्वत: एक ब्रँड आहे. त्यांना पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करतात. ही खरी ‘ब्रँड व्हॅल्यू’ आहे. हेच तत्त्व सिनेमाच्या प्रसिद्धीलाही लागू पडतं, असं बाल्की यांनी सांगितलं. उत्पादनांच्या जाहिराती वापरून किंवा प्रत्येक शोच्या सेटवर जाऊन आपल्या चित्रपटासाठी जी ओरड केली जाते ती चुकीची आहे. चित्रपटाची प्रसिद्धी ही हुशारीने करायला हवी, वैचारिकतेने करायला हवी, या बाल्की यांच्या मुद्दय़ावर मुकेश भट्ट यांनीही आपली सहमती दर्शवली. आपल्याकडे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जो गोंधळ घातला जातो तो अभूतपूर्व असतो. म्हणजे आपण पॅराशूट घेऊन विमानाच्या बाहेर उडी मारली आणि आता पॅराशूट उघडलंच नाही तर आपला कपाळमोक्ष ठरलेला.. अशा भीतीने शुक्रवारच्या त्या तिकीटबारीवरच्या आकडय़ांकडे पाहिलं जातं, जे अत्यंत चुकीचं आहे, असं मुकेश भट्ट यांनी सांगितलं. प्रत्यक्षात प्रसिद्धीसाठी एवढा खर्च करण्यापेक्षा आपला चित्रपट नेमका काय आहे हे प्रेक्षकांपर्यंत हुशारीने पोहोचवणं यात तुमची प्रतिभा दडलेली असते. हे ठसवून देताना मुकेश भट्ट यांनी दिलीपकुमार, देव आनंद, राजकुमार यांसारख्या अभिनेत्यांची उदाहरणं दिली.

ही वस्तू घ्या रे.. असं लोकांना सांगायची लाज
वाटते म्हणून रजनीकांतसारखा अभिनेता जाहिराती करणं टाळतो. तसंच माझा चित्रपट येऊन बघा हो.. किती चांगला आहे हे सांगणंही लाजिरवाणंच आहे. त्यामुळे मी कधीही प्रसिद्धी कार्यक्रमांना जात नाही, असंही तो निक्षून सांगतो. तेव्हा तरी त्यामागचा गर्भितार्थ आपल्या लोकांनी समजून घेतला पाहिजे, असं बाल्की यांनी सांगितलं. अखेरीस अभिनेता राजकुमार यांच्या एका वाक्यावर या चर्चासत्राला आपला सूर सापडला. ‘जानी को देखने के लिए तिकीट खरीदनी पडती है..’ असं राजकुमार नेहमी म्हणत असत. त्यांचा हा आत्मविश्वास कायम होता. त्यामुळे तेव्हाच्या कलाकारांनी कधीही जाहिराती केल्या नाहीत किंवा प्रसिद्धी केली नाही. तरीही काळाच्या ओघात त्यांची लोकप्रियता तशीच कायम आहे. याला म्हणतात, ‘ब्रँड’. बॉलीवूडला सध्या पूर्वसुरींच्या या ‘ब्रँड’गिरीची जास्त गरज आहे.