पावसाळा सुरू होऊन जेमतेम दोन आठवडे झाले असताना ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातील रस्ता मंगळवारी सकाळी ऐन रहदारीच्या वेळी खचला. यामुळे शहरातील रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. मंगळवारी सकाळी लोकमान्यनगर येथील डवलेनगर परिसरात ही घटना घडली. रस्ता खचलेल्या भागामध्ये मोठा खड्डा पडला आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे डागडुजीकरण करण्यात आले होते. यावेळी येथे डांबराचे थर रचण्यात आले होते. रस्ता खचलेल्या भागामध्ये मोठा खड्डा पडला आहे. रस्ता बांधण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याची तसेच याआधीही हा रस्ता दोन वेळा खचला असल्याची माहिती परिसरातील काही रहिवाशांनी दिली आहे. यामुळे यावेळीही रस्त्याचे काम करताना ते योग्यरीत्या करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता तरी महापालिकेने ही घटना गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.