पर्यटन राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन ओडिसी या पंचतारांकित रेल्वे गाडीने दिवाळीच्या सुटय़ांमध्ये ब्रेक घेतल्याने यंदा ताडोबात विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. ऑक्टोबर २०१२ ते ३१ मार्च २०१३ या पाच महिन्याच्या कालावधीत ताडोबाला १ लाख २५ हजार पर्यटकांनी भेट दिली. तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर १६ ऑक्टोबरपासून ताडोबात पर्यटन सुरू झाले असले तरी विदेशी पर्यटक येत नसल्याची चिंता रिसोर्ट, हॉटेल मालक, तसेच गाईड बोलून दाखवित आहेत.
चंद्रपूर शहरापासून अवघ्या ४५ कि.मी. अंतरावर पट्टेदार वाघांसाठी केवळ देशातच नव्हे, तर विदेशात प्रसिध्द असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. ६२५.०४ चौ.कि.मी क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वाघ, पक्षी, फुलपाखरू व वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ बनले आहे. ताडोबात हमखास वाघ दर्शन देत असल्याने गेल्या दहा वर्षांत या प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यात विदेशी पर्यटकांची संख्या मोठी होती, परंतु यावर्षी ही संख्या कमालीची रोडावली असल्याची चिंता मोहुर्ली येथील हॉटेल व रिसोर्ट मालक, तसेच गाईड बोलून दाखवित आहेत. विदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने खास डेक्कन ओडिसी ही गाडी दोन वर्षांपूर्वी सुरू केली होती. महाराष्ट्रातील पर्यटनाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गाडीतून अमेरिका, युरोप, चीन, जापान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व अन्य देशातील पर्यटक येत होते. मुंबई येथून सुटणारी ही पर्यटन राणी मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद मार्गाने वर्धा, माजरी इथपयर्ंत यायची. तेथून विदेशी पर्यटकांना खास टूरिस्ट गाडीने ताडोबात आणले जायचे. मुंबई येथून निघाल्यानंतर सात दिवसाचा हा पर्यटनाचा प्रवास असायचा, परंतु ही गाडी बंद होताच ताडोबात विदेशी पर्यटक येण्याची प्रक्रिया खंडित झाली आहे. विदेशी पर्यटक आले की, त्यांच्याकडून ताडोबा व्यवस्थापन, तसेच हॉटेल, रिसोर्ट व गाईड यांना आर्थिक लाभ व्हायचा, परंतु त्यांनी पाठ फिरविल्याने ताडोबा व्यवस्थापनही चिंतेत आहे.
गेल्या पाच महिन्यांचा विचार केला तर ऑक्टोबर २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत तब्बल १ लाख २५ हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. मात्र, विदेशी पर्यटकांची संख्या नगन्य आहे. याच काळात जवळपास चौदा हजार वाहने प्रकल्पात दाखल झाली. पर्यटक व वाहनांचे प्रवेश शुल्क मिळून अंदाजे एक कोटीवर उत्पन्न प्रकल्पाला झालेले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत ताडोबात जंगल सफारीसाठी येणाऱ्यांमध्ये अतिविशिष्ट पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. यावर्षी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सलग पाच दिवस ताडोबात मुक्काम ठोकून जंगल सफारी केली. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, मनसे नेते राज ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकांनी या प्रकल्पाला भेट दिली. आता पुन्हा १६ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुटय़ांमध्ये पर्यटकांनी ताडोबात अक्षरश: गर्दी केली आहे. ताडोबातील प्रवेशाचे ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल आहे. आज ताडोबा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असला तरी या कालावधीत एकही विदेशी पर्यटकाने भेट न दिल्याने ताडोबा व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. ताडोबात देशी पर्यटकांसाठी तेथे प्रवेश शुक्ल ७५० व शनिवार, रविवारच्या दिवशी १००० रुपये आहे तेथे विदेशी पर्यटकांना दुप्पट प्रवेश शुक्ल आहे. हत्तीच्या सफारीसाठी तर चार पट पैसे घेतले जातात. कॅमेरा व इतर वस्तूंसाठीही विदेशी पर्यटकांना दुप्पट फी आकारली आहे. डेक्कन ओडिसी सुरू असतांना विदेशी पर्यटकांची रेलचेल येथे असे, परंतु या गाडीलाच ब्रेक लागल्याने विदेशी पर्यटकांनी ताडोबाकडे अक्षरश: पाठ फिरवली आहे. तिकडे डेक्कन ओडिसी तातडीने सुरू करावी व विदेशी पर्यटकांना ताडोबात आणण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने काही उपाययोजना कराव्या, अशी मागणी रिसोर्ट मालक व गाईड यांनी केली आहे.