स्थानिक कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आणि स्थानिक कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी येथील टोलनाक्याची दोन वेळा जमावाकडून मोडतोड करण्यात आली. सलग तीन सुट्टय़ांमुळे वाढलेली वाहतूक या प्रकारामुळे प्रदीर्घ काळ खोळंबल्याने विस्कळीत झाली होती.
    हातकणंगले तालुक्यातील किणी येथील टोलनाका नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावी अनेकदा वादास कारणीभूत ठरली आहे. रविवारीही असाच प्रसंग घडला. तेथे काम करणाऱ्या रोहित धर्मेश याला व्यवस्थापनाकडून मारहाण करण्यात आली. ही माहिती धर्मेश राहात असलेल्या घुणकी व शेजारील किणी येथील नागरिकांना समजली. त्यावर दोन्ही गावातील लोक मोठय़ा संख्येने टोलनाक्यावर जमले. त्यांनी गावातील तरुणास मारहाण का केली असा जाब विचारीत व्यवस्थापनातील मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर टोल नाक्यातील काचा, फर्निचर याचीही मोडतोड करण्यात आली. या प्रकारामुळे तीन तासांहून अधिक काळ वाहतूक बंद पडली होती.    सकाळच्या प्रकारचे पडसाद ताजे असतानाच दुपारी शिवसेनेच्या वतीने किणी टोलनाक्यावर आंदोलन छेडण्यात आले. स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये प्राधान्याने घ्यावे, त्यांना पाणी, शौचालय आदी प्राथमिक सुविधा पुरवाव्यात, टोलचे दर कमी करावेत आदी मागण्यांसाठी सुमारे ४०० शिवसैनिकांनी आंदोलन केले. मागण्यांची पूर्तता आठवडाभरात न केल्यास टोलनाका उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळीही सुमारे तासभर वाहतूक खंडीत झाली होती. शिवसेनेचे वडगाव शहरप्रमुख संदीप पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप दबडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.