News Flash

गर्दी जमविण्याच्या स्पर्धेमध्ये कार्यकर्त्यांना कमालीचा ‘भाव’

विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कार्यकर्त्यांची मागणी आणि पुरवठा यात कमालीचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे त्यांचे भाव असे काही वधारले की, अवघ्या काही तासांच्या फेरीत

| October 14, 2014 07:05 am

विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कार्यकर्त्यांची मागणी आणि पुरवठा यात कमालीचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे त्यांचे भाव असे काही वधारले की, अवघ्या काही तासांच्या फेरीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाच्या हाती २०० ते ३०० रुपये पडले. कार्यकर्ते व महिलांचा सर्व उमेदवारांना तुटवडा भासल्याने शेजारील मतदारसंघातून ऐनवेळी आयातही करण्यात आले. अल्पोपहारासह पिण्याचे पाणी, वाहन व्यवस्था आदींची बडदास्त ठेवण्यात आली. ‘ऑक्टोबर हीट’चे टळटळीत उन, दिवाळीनिमित्त घरोघरी सुरू असणारी स्वच्छतेची कामे यामुळे महिलांची गर्दी जमविताना पदाधिकाऱ्यांची दमछाक झाली.
विधानसभा निवडणूकीसाठीचा जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी थांबला. जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस सार्थकी लागावा यासाठी उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न झाला. सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्याने आधीच कार्यकर्त्यांचे विभाजन झाले आहे. प्रत्येक मतदारसंघात पाचहून अधिक उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येकाची कार्यकर्ते जमविताना दमछाक झाली. दैनंदिन प्रचार, प्रचार पत्रकांचे वितरण, चौक सभा, प्रचार फेरी यासाठी आधीपासून बहुतेकांना दाम मोजून कार्यकर्ते आणावे लागले. प्रचाराचा अखेरचा दिवस त्यास अपवाद राहिला नाही. उलट या दिवशी तर कार्यकर्त्यांची मागणी अधिक पण पुरवठा कमी अशी स्थिती होती. प्रचाराच्या अंतिम टप्यात शक्ती प्रदर्शन करण्याचा बहुतेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी उमेदवारांनी ठिकठिकाणी प्रचार फेरीचे आयोजन केले होते. या शक्ती प्रदर्शनाद्वारे वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातो. मनसे, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शहर व परिसरात एकाच दिवशी प्रचार फेऱ्यांचे आयोजन केले होते. सर्व पक्षांकडून कार्यकर्ते व महिलांना मागणी आल्यामुळे आवश्यक मनुष्यबळ जमवताना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले.
‘ऑक्टोबर हीट’मुळे काही महिला घराबाहेर पडण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने महिला वर्गाने दिवाळीची कामे पूर्ण करण्याकडे कल ठेवला. त्यात, एकाच वेळी अनेक प्रचारफेऱ्या निघणार असल्याने सकाळपासून माणसांची जमवाजमव सुरू झाली. एका मतदार संघातील काही कार्यकर्ते व महिला दुसऱ्या मतदारसंघात गेल्यामुळे आपल्या फेरीत गर्दी जमवायची कशी, हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. काही तासांच्या फेरीसाठी काहींनी जादा मेहनताना देण्याची तयारी ठेवली. मनसे, भाजप, काँग्रेस व शिवसेना आदी पक्षांच्या उमेदवारांनी काढलेल्या प्रचारफेरीत सहभागी कार्यकर्त्यांना २०० रुपये तसेच नाश्ताची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बहुतेक उमेदवारांनी याच दरात घाऊक पध्दतीने कार्यकर्त्यांची जमवाजमव केली.
यावेळी काढण्यात आलेल्या फेरीत अगदी बालकांपासून ७५ ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला. आपल्या तान्ह्या बाळांसोबत तर कुठे शाळकरी मुलाचा हात धरत महिलांनी फेरीत सहभाग नोंदवला. काही कार्यकर्त्यांची बाजूच्या मतदार संघातून आयात करण्यात आली. या कोलाहलात निवडक उमेदवारांनी मात्र राहुन गेलेल्या काही भागात भेटीगाठी, चौक सभा तर महिला मेळावे घेत मतदारांशी थेट संपर्क साधणे पसंत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 7:05 am

Web Title: bribe for election campaigning
टॅग : Nashik
Next Stories
1 एकत्र न राहणारे भाऊ जनतेला कसे न्याय देतील?
2 ‘औद्योगिक विकासाची महाराष्ट्रालाही संधी’
3 दुकानदाराच्या दक्षतेने दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक
Just Now!
X