ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणारा १५० वर्षे जुना ब्रिटिशकालीन खाडीपूल वाहतुकीसाठी योग्य आहे का, याची चाचपणी करण्यासाठी महापालिकेने बुधवारपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी दिल्लीतील एका तज्ज्ञ खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत या पुलावर रिक्षा तसेच दुचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. नव्याने बांधण्यात आलेला कळवा पूल वाहतुकीसाठी तोकडा पडत असल्याने त्यास लागूनच असलेल्या ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचा अजूनही मोठय़ा प्रमाणावर वापर होत असतो. हा पूल जर्जर झाल्याची भीती व्यक्त होत असून त्यामुळे मोठा अपघात टाळण्यासाठी अभियांत्रिकी विभागाने त्याची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू केले आहे.
सर्वेक्षणाच्या कामासाठी दोन ते तीन आठवडे लागणार असून त्यानंतर या पुलाच्या वाहतूक क्षमतेचा अहवाल सादर केला जाणार आहे. कळवा येथील जुन्या ब्रिटिशकालीन खाडीपुलाच्या पायाचे कठडे कोसळू लागल्याने दोन वर्षांपूर्वी महापालिकेने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करून हा पूल दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. असे असले तरी हा पूल वाहतुकीसाठी मजबूत आहे का, याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला नसल्यामुळे येथून दुचाकी, तीनचाकी वाहतूक सुरू ठेवावी का, याविषयी एकंदर संभ्रमाचे वातावरण होते. भविष्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती अभियांत्रिकी विभागातील एका मोठय़ा गटाला वाटत आहे. त्यामुळेच महापालिकेने या पुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून पूल वाहतुकीसाठी किती मजबूत आहे, याची चाचपणी करण्यात येत आहे. दिल्लीतील एक तज्ज्ञ खासगी कंपनीने परदेशी तंत्रज्ञानाद्वारे हे काम सुरू केले आहे. पुलावरून दुचाकी व तीनचाकी वाहतूक सुरू असताना सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुलाची सर्व बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने यंत्राद्वारे पाहणी करण्यात येणार असून त्याद्वारे सर्व बाजूने निष्कर्ष काढण्यात येणार आहेत. तसेच या पुलावरून चारचाकी वाहतूक सुरू होऊ शकते का, याची चाचपणीसुद्धा या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे.