भाऊसाहेब थोरात आणि त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची कमान कधीही पडू दिली नाही. राज्याचे नाक समजले जाणारे महसूल खाते सांभाळणा-या बाळासाहेबांनी अठ्ठावीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एकही डाग अंगावर पडू दिला नाही. त्यामुळेच त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यानी केले.
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खांडगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. खासदार राम ठाकूर, आमदार सर्वश्री अशोक काळे, भाऊसाहेब कांबळे व प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भावे म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्या सुरू असताना स्वखुशीने कृषी खाते घेऊन यशस्वीपणे सांभाळणा-या बाळासाहेबांची राज्याच्या राजकारणात दमदार वाटचाल सुरू झाली. भाऊसाहेबांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासली. तोच वारसा बाळासाहेबांनी पुढे चालू ठेवला आहे. महसूलसारख्या संवेदनशील खात्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. एवढेच नाहीतर या खात्यातून सामान्यजनांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले, भाऊसाहेबांनी जिवाभावाची माणसे जोडली. सर्वप्रथम अपक्ष म्हणून संधी मिळाली. मात्र प्रामाणिकपणे काम करत राहिल्याने प्रगतीचा आलेख नेहमी चढता राहिला. विलासराव देशमुखांनी आपल्याला धाकटय़ा भावासारखे सांभाळले. त्यांनीच राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली, चांगली पदे दिली. राज्यात आत्महत्यांचे लोण सुरू असताना आपण स्वत: कृषी खाते मागून घेतले. सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही आपल्यावर विश्वास आहे. आजवरच्या वाटचालीत संगमनेरकरांचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
तांबे, काबळे, ससाणे, ठाकूर यांची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते लहानूभाऊ गुंजाळ यांनी प्रास्ताविक तर नामदेव कहांडख यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान सकाळी सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय याच्या हस्ते‘माय इंडिया क्लीन इंडिया’ मोहिमेचा प्रारंभ झाला. या वेळी मोठी गर्दी झाली होती.